मुंबई : इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या (आयपीएल) आगामी 14 व्या हंगामादरम्यान खेळाडूंना वेळेचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार आयपीएलमधील प्रत्येक सामन्याच्या एका डावातील 20 षटके 90 मिनिटांत (दीड तास) पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा खेळाडूंसह कर्णधारावर कारवाई केली जाऊ शकते.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यातील लढतीने 9 एप्रिलपासून ‘आयपीएल’ला प्रारंभ होणार आहे. साधारणपणे 90 व्या मिनिटाला अथवा त्यानंतर 20 व्या षटकाला सुरुवात होते. परंतु बहुतांश वेळा क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाचा कर्णधार तसेच फलंदाज सामन्याच्या परिस्थितीनुसार अतिरिक्त वेळ खर्ची घालून सामना लांबवतात. त्यामुळे प्रेक्षकांचाही खोळंबा होतो. म्हणूनच या ‘आयपीएल’मध्ये संघांना 90 मिनिटांत 20 षटकांच्या गोलंदाजीची जबाबादारी पेलावी लागणार आहे. यामध्येच अडीच मिनिटांच्या दोन रणनीतीच्या विश्रांतीचाही समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक तासाला 14.1 षटके पूर्ण करण्याचे बंधन संघांना असेल. त्यानुसार 90 मिनिटांच्या कालावधीत (दोन रणनीतीच्या विश्रांतीसह) 20 षटके नक्कीच पूर्ण होतील. तसे न झाल्यास खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून रक्कम कापण्यासह कर्णधारावरही कारवाई करण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकार्‍याने सांगितले.

पंचांच्या अंदाजित आढाव्यालाही बंदी

भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान चर्चेचा मुद्दा ठरलेल्या मैदानावरील पंचांच्या अंदाजित आढाव्यालाही (सॉफ्ट सिग्नल) ‘आयपीएल’दरम्यान बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही निर्णयाविषयी साशंका असल्यास मैदानावरील पंचांनी अंदाजित निर्णय न घेता थेट तिसर्‍या पंचांकडे जबाबदारी सोपवावी. तिसर्‍या पंचांना योग्य पुराव्यानुसार अंतिम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा