परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाने फटकारले

मुंबई : गृहमंत्र्यांकडून गुन्हा घडत असल्याचे दिसत असताना तुम्ही गप्प का बसलात? तुम्ही गुन्हा दाखल का केला नाहीत? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना धारेवर धरले. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला आहात, असे खडे बोल न्यायालयाने सुनावले.

परमबीर सिंह यांच्या अर्जावर काल उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने सिंह यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची आणि त्यांच्या कारभाराची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी परमबीर यांनी फौजदारी जनहित अर्जाद्वारे केली होती. त्यावर तक्रार किंवा एफआयआर दाखल नसताना सीबीआय चौकशीच्या आदेशाची मागणी तुम्ही कशी करत आहात? असाही प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

तुम्ही जे आरोप करत आहात त्याचा पुरावा काय? गृहमंत्र्यांकडून पैशांची मागणी केली जात असताना वा पैसे जमा करण्यास सांगितले जात असताना तुम्ही स्वतः तिथे होता का? अशी विचारणा करत तुमच्या आतापर्यंतच्या म्हणण्यावरून तुम्ही केलेले आरोप ऐकीव माहितीवर आधारित आहेत, असेही न्यायालयाने सुनावले.

तुम्ही पोलीस आयुक्त आहात म्हणून तुमच्यासाठी कायदा बाजूला ठेवायचा का? पोलीस अधिकारी, मंत्री आणि राजकारणी कायद्यापेक्षा मोठे आहेत का? स्वत:ला इतके मोठे समजू नका, कायदा तुमच्यापेक्षा मोठा आहे, असेही न्यायालयाने यावेळी खडसावले.

दरमहा 100 कोटी वसूल करून द्यावेत म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागणी केली होती, या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा