संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

नामस्मरणाचा अभ्यास करताना तुकाराम महाराजांनी जे कष्ट घेतले ते सामान्य माणूस करू शकत नाही म्हणून मी सांगतो तुकाराममहाराज ते तुकाराममहाराज, रामकृष्ण परमहंस ते रामकृष्ण परमहंस. त्यांनी पैशाला कधी हात लावला नाही हे तुम्ही करू शकाल? आपण आपली बरोबरी कुणाशीही करू नये. आज दारिद्रय रेषेखाली कोट्यवधी लोक आहेत त्याचे कारण काय? मुलांना जन्म देणे सोपे आहे पण त्यांचे लालनपालन पोषण संवर्धन शिक्षण हे सर्व करावे लागते तेव्हा किती मुलांना जन्म देणार हे ही पहावे लागते. आपल्या देशांत पॉप्युलेशन इतके वाढलेले आहे की आपला देश याबाबतीत चीनच्याही पुढे जात आहे. पॉप्युलेशन इतके प्रचंड वाढलेले आहे की त्यात कुणी लक्ष द्यायला बघत नाही, त्यात लक्ष देण्याची कुणाची हिंमत होत नाही. याला जबाबदार कोण? याला जबाबदार माणूसच आहे. याला जबाबदार परमेश्वर नाही. दारिद्रयरेषेखाली जायला कारण तुम्ही आहात. कर्ताही माणूसच आहे व करविताही माणूसच आहे हे मला सांगायचे आहे. कर्ता करविता देव आहे असे आपण म्हणतो पण कर्ता करविता देव केव्हा? व कर्ता करविता तू केव्हा? हे लक्षांत घेतले पाहिजे. तुमच्या ठिकाणी असलेले मी व माझेपण गळून पडते तेव्हा उरला उरे विठ्ठल अशी अवस्था होते व या अवस्थेत जे करशील तेव्हा कर्ता करविता देव पण आज तू बद्ध अवस्थेत आहेस, जीव अवस्थेत आहेस तोपर्यंत कर्ताही तूच व करविता ही तूच. देवस्वरूप झालास, आनंदस्वरूप झालास की कर्ता करविता परमेश्वर. हे मी का सांगतो आहे कारण लोकांचे गैरसमज झालेले आहेत की कर्ता करविता परमेश्वर म्हटले की जे वाट्याला येते ते भोगायचे प्रारब्ध असे सांगितले जाते. आम्ही असे सांगतो की प्रारब्ध भोगत असताना प्रारब्ध हे सौम्य झाले पाहिजे व नियती प्रभावी झाली पाहिजे. प्रारब्ध हे गौण झाले पाहिजे व नियती ही तेजस्वी झाली पाहिजे यासाठी परस्परक्रिया टाकण्याची सवय झाली पाहिजे. ही परस्परक्रिया कशी टाकायची हे शिकले पाहिजे. प्रारब्ध हे तसेच भोगायचे असते हे जीवनविद्येला मान्य नाही. ज्याच्याजवळ अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकिय मदत या पाच गोष्टी असूनही दुःखी आहे तर त्या दुःखाला तूच जबाबदार आहेस हे मला सांगायचे आहे. सर्व काही असूनही भांडणारे लोक जगांत आहेत. एक वीत जागा भावाने जास्त घेतली म्हणून दुसरा भाऊ कोर्टात गेला. भांडता भांडता एक भाऊ आधी वर गेला व दुसरा भाऊ नंतर वर गेला. बिल्डिंग बांधत असताना दोन्ही भावांना दोन दोन मजले आले होते मग भांडण्याचे काही कारण होते का?

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा