मुंबई, (प्रतिनिधी) : पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असतानाच आता मुंबई व आजूबाजूच्या शहरात (एमएमआर) 1 मार्चपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात तीन रुपयांनी वाढ होणार आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये होणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या संकटामुळे उपनगरीय रेल्वेत ठराविक कालावधीतच सर्वसामान्यांना प्रवास करता येतो. याचा सगळा ताण बस वाहतुकीवर येतो. त्यामुळे परवडत नसतानाही नोकरी टिकवण्यासाठी सर्वसामान्यांना रिक्षा व टॅक्सीने प्रवास करावा लागत असताना त्यांच्यावर आता भाडेवाढीचा आणखी भार पडणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या व सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षा व टॅक्सीचे दर वाढवावेत, अशी मागणी होत होती. बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही संघटनांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने भाडेवाढीला परवानगी दिली आहे. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार, एमएमआर रिजनमधील रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू होईल. गेल्या 6 वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाडेवाढ करण्यात आली असल्याचे परब यांनी सांगितले.

या भाडेवाढीनंतर रिक्षाचे दरात तीन रुपयांची वाढ होणार आहे. रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला सध्या 18 रुपये द्यावे लागतात, 1 मार्चपासून 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 14 रुपये 20 पैसे मोजावे लागतील. तसेच टॅक्सीसाठी 22 रुपयांऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 25 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 16 रुपये मोजावे लागणार आहेत. 31 मेपर्यंत रिक्षा व टॅक्सी चालकांना मीटरमध्ये आवश्यक बदल करून घ्यावा लागणार आहे. तोवर कार्डनुसार वाढीव भाडे आकारता येईल. मात्र, 1 जूनपासून मीटरप्रमाणेच आकारणी करावी लागेल अशी माहितीही परब यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा