कॉनवेचे शतक एका धावेने हुकले

ख्राइस्टचर्च : डेव्हन कॉनवेच्या झुंजार खेळीच्या जिवावर न्यूझीलंडने पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 53 धावांनी धुव्वा उडवला. या विजयाबरोबर न्यूझीलंडने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडची अवस्था 4 षटकात 3 बाद 19 अशी केली. मात्र, नवख्या डेव्हन कॉनवेने न्यूझीलंडला संकटातून बाहेर काढत 99 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 184 धावा केल्या. कॉनवेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक फक्त एका धावेने हुकले. कॉनवेला ग्लेन फिलिप्स 30 आणि जिम्मी निशमने 26 धावा करत चांगली साथ दिली.

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या संघाची सुरूवात खराब झाली. कर्णधार अ‍ॅरोन फिंच वैयक्तिक 1 धाव काढून बाद झाला. ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बाद होत गेले. तेव्हा मिचेल मार्शने 45 धावा करत थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसर्‍या बाजूने साथ लाभली नाही.

ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 17.3 षटकात 131 धावांवर सर्वबाद झाला. इश सोढीने सर्वाधिक 4 गडी बाद केले. टिम साऊथी, ट्रेट बोल्ट यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. कायले जेमिन्सन आणि मिशेच सॅटनर यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला. 59 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 99 धावांची खेळी करणारा कॉनवे सामनावीर ठरला.

अश्विनने घेतली कॉनवेची फिरकी!

न्यूझीलंडला संकटातून बाहेर काढणार्‍या डेव्हन कॉनवेच्या या खेळीचे क्रिकेट विश्वातही पडसाद उमटले आहेत. भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने ’डेव्हन कॉनवे तुला फक्त चार दिवस उशीर झाला.’ असे ट्विट करत त्याची फिरकी घेतली आहे. चार दिवसांपूर्वी भारतामध्ये आयपीएलसाठी खेळाडूंचा मिनी लिलाव चेन्नईत झाला. या लिलावात कॉनवेने नोंदणी केली होती. 50 लाख बेस प्राइज असलेल्या कॉनवेवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही; पण त्याने लिलावानंतर स्फोटक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यापूर्वी त्याने ही खेळी केली असती, तर त्याला चांगला भाव मिळाला असता असा या ट्विटचा संदर्भ आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा