लोकप्रतिनिधींची मागणी; जलसंपदा विभागाचा प्रस्ताव तयार

पुणे : जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाची उंची वाढवण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. त्यानुसार या धरणाची उंची एक मीटरने वाढवण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने तयार केला आहे. तसेच याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

खेडच्या पश्चिम भागात भामा आसखेड हे धरण आहे. सन 2000 मध्ये जिल्हा प्रशासनाने 23 गावांमधील एक हजार हेक्टर जमीन संपादित करून हे धरण बांधण्यात आले आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता 8.67 अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. या धरणातून चाकण शहर व औद्योगिक वसाहत, पुणे शहराचा पूर्व भाग, पिंपरी चिंचवड, आळंदी शहरासह खेड, शिरूर आणि दौंड तालुक्यातील बंधार्‍यांना सोडण्यात येते.

दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दर वर्षी पावसाळ्यात 1200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होतो. त्यामुळे परिसरातील ओढे, नाल्यांसह भामा नदीला पूर येऊन नदीवरील रस्ते पाण्याखाली जातात. तसेच धरणाखालील 19 गावे पावसाळ्यात भीतीखाली असतात. त्यामुळे या धरणाची उंची वाढवावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने करण्यात येत आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर जलसंपदा विभागाने धरणाची उंची एक मीटरने वाढवण्यात येऊ शकते, असे सांगितले. त्यावर याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना पालकमंत्री पवार यांनी विभागाला दिल्या आहेत.

धरणाची उंची वाढवण्यात कायदेशीर अडचणी

कृष्णा खोर्‍यातील पाण्याबाबत कृष्णा खोरे लवादाच्या बंधनानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार धरणांची संख्याही निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील धरणे बांधण्याची क्षमता पूर्ण झाली आहे. परिणामी आता पुणे जिल्ह्यात नवे धरण बांधणे शक्य नाही. तसेच अस्तित्वात असलेल्या धरणांची उंचीही वाढवता येत नाही.

पूर नियंत्रणासाठी उंची वाढवण्याचा प्रस्ताव

कृष्णा खोरे लवादाच्या बंधनानुसार धरणाची उंची वाढवता येत नाही. मात्र, भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिरिक्त पाऊस झाल्यास धरणाखालील 19 गावांना पुराचा धोका आहे. त्यामुळे अतिरिक्त झालेल्या पावसाचे पाणी साठवणे आणि त्यानुसार धरणातून टप्प्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग करणे, यासाठी धरणाची उंची एक मीटरने वाढवावी. या प्रस्तावाला कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून ‘फ्लड पॉके ट’ तयार करण्यात येत आहे, असे कृष्णा लवादाला सांगण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा