नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून पतंजलीच्या ‘कोरोनिल’ची जाहिरात करण्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) कडून आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.

या आधी, गेल्या वर्षी २३ जून रोजी कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी ‘कोरोनिल’ नावाचे एक ‘इम्युनिटी बुस्टर’ अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध काढण्यात आले. त्यावरून मोठा वाद झाल्यानंतर हे औषध केवळ कोरोनावर मात करू शकत नसल्याचे तसेच हे औषध केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करेल, असे पतंजलीकडून स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानंतर बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’कडून ‘कोरोनिल टॅबलेट’ नावाने दुसऱ्यांदा हे आयुर्वेदिक औषध बाजारात आणले. या औषधाला ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या निर्देशांनुसार, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून या औषधाला मंजुरी दिल्याचा दावा योगगुरु रामदेव बाबा यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु, संयुक्त राष्ट्राच्या एका अधिकृत ट्विटमध्ये मात्र हा दावा फेटाळण्यात आला. ‘जागतिक आरोग्य संघटने’कडून कोरोनावर उपचारासाठी कोणत्याही प्रकारच्या पारंपरिक औषधाच्या प्रभावाला मंजुरी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण डब्ल्यूएचओने दिले.

कोरोनिलमुळे जगातील १५८ देशांना कोरोनाशी दोन हात करण्यात मदत मिळेल असा दावाही पतंजली आणि रामदेव बाबा यांच्याकडून करण्यात आला. यावेळी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी रोजी औषधाच्या लॉन्चिंगसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते.

यावर आयएमएकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ‘देशातील जनतेसमोर अशा खोट्या जाहिरात करणाऱ्या तसेच अवैज्ञानिक उत्पादनांची जाहिरात करणे देशाच्या आरोग्यमंत्र्यांना शोभतं का? अनैतिक, चुकीच्या आणि खोट्या मार्गाने अशा प्रकारे प्रोत्साहन देणं नैतिकतेत बसतं का?’ असे प्रश्न आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयलाल यांनी विचारले आहेत.

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या संहितेनुसार, कोणताही डॉक्टर कोणत्याही औषधाची जाहिरात करू शकत नाही. धक्कादायक म्हणजे, इथे खुद्द आरोग्यमंत्री एक डॉक्टर असून औषधाचा प्रचार करताना दिसत आहेत, असा आक्षेपही आयएमएने नोंदवला. हा संपूर्ण देशाचा अपमान असल्याचे म्हणत आयएमएने आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे याबद्दल स्पष्टीकरण मागितले.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा