जुन्नर, (वार्ताहर) : आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांचे अढळस्थान आहे. प्रत्येक, चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे; पण तोंडावर मास्क आहे. छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढताना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सर्वांना जोडणारे शिवराय आहेत, असे गौरवोद्गार काढतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार असल्याचे सांगितले.किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या प्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शिवरायांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. छत्रपती दैवत का आहे, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाशी लढताना ही प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. संपूर्ण जगात शिवरायांचे तेज पसरवणार, असे सांगून त्यांनी पुरस्कारप्राप्त शिवभक्तांचे अभिनंदन केले.

अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. कोरोना नियमांचे पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरांत, मनामनांत साजरा होऊदे, असे आवाहन त्यांनी केले.

शिवनेरी परिसरातील विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी संपूर्ण शिवनेरीचे पावित्र्य, महत्त्व लक्षात घेता विकास कामे दर्जेदार करावीत; तसेच कामे वेळेत सुरू करून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा