सोलापूर : ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाची कुंभार कन्येशी बाराव्या शतकांमध्ये झालेल्या प्रतीकात्मक विवाह सोहळा बुधवारी पुन्हा करण्यात आला. सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टाजवळ कोरोनाचा सर्व नियम पाळत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अक्षता सोहळा पार पडला. गेली शेकडो वर्षे लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणारा अक्षता सोहळ्याला यंदा केवळ २०० पेक्षाही कमी भाविकांची उपस्थिती होती.
सिद्धेश्वर मंदिर परिसरात संमती कट्ट्याजवळ सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास श्रींची पालखी, योगदंड व मानकरी हिरेहब्बू, देशमुख मानकरी शेटे यांचे आगमन झाल्यानंतर अक्षता सोहळ्यातील विधींना प्रारंभ झाला.

या सोहळ्यासाठी दरवर्षी कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील लाखो भाविकांची उपस्थिती असते. परंतु यंदा कोरोनाच्या सावटामुळे प्रशासनाने केवळ पन्नास जणांनाच अक्षता सोहळ्यासाठी परवानगी दिली होती. या ५० जणांच्या उपस्थितीमध्ये अक्षता सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला.दर वर्षी अक्षतेला दुपारचे दोन ते साडेतीन वाजायचे मात्र, यंदा साडे अकरा वाजता अक्षता सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षी नंदीध्वज मिरवणूकीस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मानाचे नंदीध्वज सातही नदीध्वज आहे त्या ठिकाणी ठेवून योगदंडाच्या उपस्थितीमध्ये अक्षता सोहळा पार पडला. कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून सकाळी मानकरी हिरेहब्बू यांनी योगदंड घेऊन सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले. नंदीध्वज सम्मती कट्ट्याजवळ आल्यावर कुंभार समाजाच्या मानकऱ्यांना मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्याकडून मानाचा विडा देण्यात आला. योगदंडाच्या साक्षीने पूजा झाली. मानकरी सुहास शेटे यांच्याकडून मंगलाष्टका म्हटल्या जातात. संमती कट्टा येथे सुहास शेटे यांनी सम्मतीवाचन केले. अक्षता सोहळ्या नंतर ६८ शिवलिंगातील पहिले अमृतलिंगाचे पूजन झाले. अक्षता सोहळा पार पडल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या गदगीची पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिरात काहीकाळ विश्रांती घेउन ६८ शिवलिंगांना अभिषेकासाठी मानकरी योगदंडास मार्गस्थ झाले.

या अक्षता सोहळ्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, देवस्थानचे विश्वस्त मल्लीकर्जून कळके, माजी आ. विश्वनाथ चाकोते, सिद्धाराम चाकोते, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, सुभाष मुनाळे यांच्यासह देवस्थानचे ट्रस्टी व मानकरी उपस्थित होते.

शुक्रवार पेठेतही अक्षता सोहळा

सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाचे प्रतीक म्हणजे नंदीध्वज. परंतु कोरोना विषाणूच्या सावटामुळे यंदा प्रशासनाने नंदीध्वज मिरवणूक काढण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मानाचे सात ही नंदिध्वज आहे त्या ठिकाणीच असून बुधवारी मानाच्या सहाव्या नंदीद्वजाचा अक्षता सोहळा शुक्रवार पेठ येथे पार पाडण्यात आला. नंदीध्वज क्रमांक सहाचे मानकरी राजेंद नागनाथ बनसोडे, ओंकार बनसोडे, रितेश बनसोडे व इतर मानकरी मानकरी बंधू हे आपल्या राहत्या निवासस्थानी नंदीध्वज व अक्षता सोहळा पार पाडले.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला मर्यादा आल्या आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी नुसारच अत्यंत साधेपणाने धार्मिक पद्धतीने सुसंपन्न अशी यंदा यात्रा पार पडत आहे. मकर संक्रांती निमित्त सर्व सिद्धेश्वर भक्तांना शुभेच्छा.

खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर सिद्धरामेश्वर यात्रा हे सोलापूर शहराचा उत्सव असून, दरवर्षी मकर संक्रातीला अक्षता सोहळ्याला कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेशातून लाखो भाविक उपस्थित असतात. परंतु कोरोनामुळे यंदा मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत यात्रा सोहळा पार पडत आहे. संपूर्ण सोलापूर शहरासह देश कोरोनामुक्त होवो हीच सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना.

दत्तात्रय भरणे, पालकमंत्री

सुगडी पूजनाचे महत्त्व

सिद्धेश्वर तलावातील पाणी १४ सुगंधीत (मडक्यात) गंगा पूजनासाठी घेण्यात आले. सिद्धरामेश्वरांनी स्व:हस्ते तलाव खणून येथे सर्व नद्यांना वास करण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जाते. गंगा पूजनानंतर कुंभार समाजातील मानकऱ्यांना विडा देण्यात आला. त्या वेळी अक्षतेस मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर विधीला प्रारंभ झाला.

सिद्धेश्वर अक्षता सोहळ्यातील अख्यायिका

सिद्धरामेश्वर योगसाधनेत मग्न असत. ते जेव्हा साधना स्थळाच्या बाहेर येत, तेव्हा त्यांना अंगणात सडा घालून रांगोळी रेखाटलेली दिसे. हे काम कोण करते हे त्यांना कळेना. एके दिवशी ते नेहमीच्या वेळेआधी साधना गृहाबाहेर आले तेव्हा एक सुंदर तरुणी सडा घालून रांगोळी काढत असलेली त्यांना दिसली. तिने ही विस्मयचकित होऊन नमस्कार केला. शिवयोगी सिद्धरामांनी त्या तरुणीला प्रश्न केला. तू कोण आहे, आणि हे काम का करीत आहे. तेव्हा मी एक कुंभारकन्या आहे, आपली सेवा घडावी म्हणून मी रोज अंगणात सडा घालून रांगोळी काढते, असे उत्तर त्या तरुणीने दिले. सिद्धरामांनी अधिक चौकशी केल्यावर त्यांना कळले की, त्या कुंभारकन्येची त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. तिने आपली इच्छा व्यक्त केल्यावर सिद्धाराम म्हणाले, ‘मी लिंगांगी आहे. मल्लिकार्जुन माझे पती असून, मी त्यांची सती आहे. अशास सती- प्रतिभावाने मी साधना करीत आहे. मग एक स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीशी विवाह कसा होऊ शकेल? सिद्धरामांनी तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला. तेव्हा तिने अत्यंत व्याकुळतेने त्यांची विनवणी केली. शेवटी सिद्धरामांनी तिला आपल्या हातातील योगदंडाशी प्रतीकात्मक लग्न करण्यास सुचविले. त्या प्रमाणे कुंभार कन्येने योगदंडाशी विवाह केला. या प्रतीकात्मक विवाह सोहळ्यात स्वतः सिद्धरामेश्वर सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी हरिद्रालेपन, तैलाभिषेक होऊन विवाह विधींना आरंभ झाला. सिद्धरामांनी स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांना व देवदेवतांना अक्षता दिल्या. दुसऱ्या दिवशी सम्मती काट्टयावर अक्षताविधी पार पडला. सिद्धरामांनी स्वतः रचलेली पाच मंगलाष्टके म्हटली जातात.अक्षता विधीनंतर वरात निघते. ६८ शिवलिंगांना भेटी दिल्या. तिसऱ्या दिवशी मकर संक्रमणाच्या पर्वकाली योगदंडाला पवित्र तळ्यात स्नान घालण्यात येते. कुंभारकन्या सचैल स्नान करून सौभाग्य लेणे लेऊन सती जाण्यास सिद्ध झाली. आपल्याला अध्यात्मिक मुक्ती मिळाली, असे मानून होमकुंडात उडी घेऊन ती सती गेली. हा विवाह विधी दर वर्षी यात्रेच्या वेळी सर्व तपशिलांसह साजरा केला जातो. नंदीध्वज हा सिद्धरामांच्या योगदंडाचे प्रतीक होय. नंदीध्वज, अक्षतासोहळा आणि होमप्रदीपन सोहळा या प्रथेमागे, अशी आख्यायिका आहे.

सिद्धेश्वर महाराजांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा संपन्न
मानकरी हिरेहब्बू यांनी योगदंड घेऊन सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा