संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

अहंकाराला तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला तर तो अधिकच चिकटेल. तुम्ही त्याला सोडण्याचा प्रश्नच नाही कारण त्याने तुम्हांला धरलेले आहे. त्याचे कारण देवाचा विसर. देवाचा आठव, देवाचे स्मरण, देवाची भक्ती संतांना आवडते. माझे मीपण मरूनी गेलो किंवा आपुले मरण पाहिले म्यां डोळा, जाहला तो सोहळा अनुपम्य. खरा आनंदी कोण? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. हा खरा आनंद आहे. तुकाराम महाराज थोड्या वेगळ्या शब्दांत सांगतात, तुका म्हणे बळी, जीव दिधला पायतळी. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार हे सर्व दुःखाचे मूळ आहे हे लक्षांत ठेवले तर आपल्याला जे काही करायचे आहे ते हया ठिकाणी करायचे आहे. तुम्ही कितीही शिक्षण घेतले, सत्ताधीश झालात, कितीही पैसे मिळविले तरी तुम्ही सुखी होणे शक्य नाही. या सर्व गोष्टींनी शरीराच्या सोयी होतील पण सुख मिळेलच असे नाही. मोटार घेतली की चालण्याचा सराव जातो, चालण्याचा सराव गेला की व्यायाम होत नाही, व्यायाम झाला नाही की शरीरप्रकृती बिघडते. याचा अर्थ पैसा नको असा नाही, सत्ता संपत्ती नको असा नाही. हे सर्व पाहिजे पण त्याठिकाणी अहंकार होता कामा नये. सत्ता हवी पण सत्तेचा अहंकार नको. सत्ता आली की त्याच्याठिकाणी नकळत अहंकार निर्माण होतो. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. तुकाराम महाराज म्हणतात कसला अहंकार करता?.खरे म्हणजे ज्याने कोंडिले अनंता , तो नम्र झाला भूता असे ते उलटे आहे. ज्याने देवाला धरलेले आहे तो नम्र होतो व ज्याने देवाला धरलेले नाही तो नम्रच होवू शकत नाही. लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती ऐरावती रत्न थोर तया अंकुशाचा मार तुका म्हणे जाण, व्हावे लहानाहूनी लहान. इतके लहान, इतके लहान व्हायचे की नाहिसेच व्हायचे. असे नाहिसे होतो तेव्हा उरतो तो देव. हयासाठी सतत देवाचे स्मरण पाहिजे. ज्याचे नांव घेसी तोची तू आहेसी हे मीपणाचे मूळ पहा. मीपणाचे मूळ हे देवाच्या विसरांत आहे. देवाचा आठव केला पाहिजे. देवाचा विसर झाला की भ्रम निर्माण होतो. हया भवभ्रमातून कल्पना निर्माण होते. कल्पनेतून अहंकार निर्माण होतो व त्यातून सर्व दुःख निर्माण होते. हया अहंकाराला बळी देणे म्हणजे जीवाला बळी देणे. जीवपणा म्हणजे मीपणा. हयालाच अहंकार म्हणतात. मी असा मी अमूक हयाची गरज पडते पण ती चोवीस तास गरज पडत नाही. ते व्यवहारापुरते पाहिजे. तुका म्हणे उरलो उपकारापुरता. व्यवहारापुरते मीपणा पाहिजे. तुमचे नांव काय? मी परब्रम्ह असे सांगितले तर लोक म्हणतील याला वेड्याच्या इस्पितळांत पाठवा.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा