दुर्घटना टाळता आली असती

भंडारा जिल्हा रुग्णालयात झालेल्या निष्पाप बालकांची दुर्दैवी घटना ही रुग्णायांच्या पायाभूत सोयी आणि प्रशासन यांच्यावर समोर उभा राहिलेला मोठा प्रश्न आहे. आता फायर ऑडिट आणि चौकशी व आर्थिक मदत देऊन काय होणार आहे? जिल्हा रुग्णालयाची जी अवस्था त्याहीपेक्षा भयंकर सोसायटीच्या मजल्यावर अथवा गल्लीतील वन-प्लस चाळींमध्ये उभारलेल्या नर्सिंगहोमची अवस्था बिकट आहेच. परंतु, जोपर्यंत एखादी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत प्रशासन जागे होत नाही. हाच परिपाठ आपण नेहमी बघत आलो आहोत नाही का? आता सर्व प्रथम उच्चस्तरीय चौकशी, मग आर्थिक मदत, नंतर दोषींवर कारवाई ही नेहमीची समीकरण मांडली जातील; पण त्यामुळे ज्या नवजात बालकांनी अजून आपल्या जन्मदात्रीचा नीट चेहरासुद्धा बघितला नाही, त्यांचा काय दोष होता. जर रुग्णालयांच्या सुरक्षितता आणि रुग्णांच्या प्रति शासनाला काळजी असती, तर अशा घटना टाळता आल्या असत्या. रुग्णालय आणि नर्सिंगहोम यांना परवानग्या कोण देते? शासन यंत्रणा देते ना? मग या यंत्रणेला रुग्णांच्या सुरक्षितता आणि सोयी सुविधा यावर लक्ष देता येत नाही का? का निव्वळ आपली सोय झाली की परवाना मंजुरीचा शिक्का मारायचा? प्रशासन आणि त्याच्या नोकरशाही यांच्या अनास्थेमुळे हे जग बघण्या आधीच हरवली पाखरें.

दत्तप्रसाद शिरोडकर, मुलुंड

सरकारची बेपर्वाई

येत्या प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याची शेतकर्‍यांनी धमकी दिली असल्याचे वृत्त वाचनात आले. भारतीय शेतकरी बिघडले, शेती करणे सोपे आहे व पुरेसे अनुदान दिले गेलेले आहे, अशी ज्यांनी स्वत:च्या मनाची सोईस्कर समजूत करून घेतली आहे, त्यांनी हे पक्के लक्षात ठेवावे की गेल्या 25 वर्षात 3 लाख 75 हजारांपेक्षाही अधिक शेतकर्‍यांनी स्वत:चे जीवन संपविले आहे. देशातील सगळ्या राज्यांमधील सर्व थरातील शेतकरी धरणे आंदोलनात सामील झालेले नाहीत, असे निवेदन भारतीय जनता पक्षातर्फे वारंवार केले जात आहे. याचा अर्थ केंद्र सरकारने शेतकर्‍यांची दखल घ्यावी म्हणून देशातील 65 कोटी शेतकर्‍यांनी निषेधासाठी धरणे धरले पाहिजे, असा समजावयाचा काय ?

अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे

शेतकर्‍यांचा विरोध का?

केंद्र सरकारने पास केलेल्या विधेयकाविरोधात गेले अनेक दिवस झाले राजधानी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक सरकारे आली आणि गेली; पण आजपर्यंत कोणत्याही सरकारने शेतकर्‍यांना उपयुक्त असा कोणताच निर्णय घेतलेला नाही. सध्याचे सरकार शेतकरी विरोधी विधेयक लागू करत आहे. जर शेतकर्‍यांच्या हिताचे विधेयक असते, तर याला एवढा विरोध झाला नसता, ही साधी व सोपी समजणारी गोष्ट आहे. त्यामधील पहिलं विधेयक एक देश, एक बाजार असे असून, यापुढे शेतकरी आपला शेतीमाल स्थानिक बाजार समितीच्या बाहेर देशामध्ये कोठेही विकू शकतो, एक देश, एक बाजार पद्धतीत दलालांचा हस्तक्षेप बंद होणार असला, तरी देशाच्या खुल्या बाजारात शेतमाल विकण्याइतपत सर्वसामान्य शेतकरी सक्षम नाही.

राजू जाधव, मांगूर, जि. बेळगांव)

नवीन वसाहतीला अटकाव करावा…..

डेक्कन नदीपात्रातून बाबा भिडे पूल डेक्कन जिमखाना मेट्रो पुलाच्या खाली बाहेर गावावरून आलेल्या लोंढ्यांनी नवीन वसाहत (चाळ) बांधली आहे. या लोकांना दरवर्षी पूरग्रस्त म्हणून मदतही दिली जाते. परंतु आता ही वसाहत (चाळ) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या ठिकाणी दररोज कचरा जाळला जात आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर उद्या नागरिकांच्या करातून त्यांच्यासाठीही एस.आर.ए.ची स्कीम करून द्यावी लागेल. याचा गांभीर्याने प्रशासनाने विचार करावा.

अनिल बाळासाहेब अगावणे, पुणे.

महिला वैमानिकांनी इतिहास घडविला…

आज महिला सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखविताना दिसत आहेत. मग ते प्रशासकीय सेवा असो, लष्कर असो की वायुदल असो या सर्व क्षेत्रात त्या काम करीत आहेत. संशोधन, राजकारण शिक्षण, अंतराळ भ्रमण, ह्या क्षेत्रातही त्या उत्तम कामगिरी करत आहेत. नुकताच एअर इंडियाचे बोईंग 777-200 एल आर विमानाच्या वैमानिक महिला कर्मचार्‍यांनी आपला आणखी एक विक्रम इतिहासात नोंदविला. हे विमान सॅनफ्रान्सिस्को येथून निघून दीर्घ प्रवास करत बेंगलोर येथे उतरले. या प्रवासातील अंतर 13 हजार 993 किलोमीटर एवढे आहे. हे विमान सुमारे 30 हजार फुटांवरून उड्डाण करत होते. या विमानात सर्वच महिला वैमानिक होत्या. दीर्घ पल्ल्याचे हे पहिलेच व्यावसायिक विमान असल्याचा दावा एअर इंडियाने केला आहे. कॅप्टन झोया अग्रवाल, पापगिरी तन्मयी, शिवानी मनहास व महाराष्ट्रातील आकांक्षा सोनवणे यांचा समावेश होता. काही वर्षांपूर्वी अंतराळ वीर म्हणून कल्पना चावला यांनी जगाला आपली ओळख करून दिली होती. आजही ह्या सर्व महिला वैमानिकांनी आपली कामगिरी जगाला दाखवून दिली आहे. आत्मविश्वास व जिद्द या जोरावर त्यांनी हे यश मिळविले आहे.

शांताराम वाघ, पुणे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा