दहशतवादी आणि दहशतवादी गट असल्याचे घोषित करण्यासाठी करण्यात आलेल्या विनंतीमध्ये विनाकारण खोडा घालण्याची प्रथा संपुष्टात आणलीच पाहिजे, असे मत भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) व्यक्त केले.

पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये चीनकडून सातत्याने आडकाठी आणण्यात येत असल्याच्या संदर्भाने भारताने वरील मत व्यक्त केले.

या संघर्षांत आपल्याकडून दुहेरी नीतीचा अवलंब होऊ देता कामा नये, दहशतवादी हे दहशतवादीच आहेत, चांगले आणि वाईट दहशतवादी असा फरक होऊ शकत नाही, जे असा फरक करतात त्यांचा विशिष्ट हेतू आहे आणि त्यावर जे पांघरूण घालतात तेही दोषी आहेत, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले.

या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला निर्बंध आणि दहशतवाद प्रतिबंधसंबंधात काम करणाऱ्या समित्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केलीच पाहिजे, पारदर्शकता, परिणामकारकता आणि जबाबदारी ही सध्या गरजेची आहे, विनाकारण खोडा घालण्याची प्रथा संपुष्टात आणली पाहिजे, असेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

‘जर-तर, दुटप्पी भूमिका नको’

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जर-तर किंवा दुटप्पी भूमिका नसावी, असे भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेमध्ये (यूएनएससी) स्पष्ट केले. मुंबईमध्ये १९९३ मध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींना केवळ संरक्षणच देण्यात येत नाही तर त्यांचे पंचतारांकित आदरातिथ्य केले जात आहे, असेही भारताने कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम याला पाकिस्तानात आश्रय देण्यात आल्याच्या संदर्भाने सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा