बर्ड फ्लूने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्लीसह किमान दहा राज्यांमध्ये या रोगाचा शिरकाव झाला असून इतरत्रही त्याचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. कोरोनावर लस आली, याबद्दल नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास सोडला जात असतानाच हे नवे संकट उभे राहिले. बर्ड फ्लूने उत्तराखंडात दोनशे पक्षी मरण पावले. सूरत, वडोदर्‍यात कावळे आणि कबुतरांचे मृत्यू होत आहेत. मुंबई, ठाणे, दापोली, बीड, परभणी या ठिकाणी कोंबड्यांसह अन्य पक्षांचा बर्ड फ्लूने बळी घेतला. कोरोनाचा जोर थोडा ओसरल्यावर समाजजीवन पुन्हा सुरळीत होत असताना बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव चिंता वाढविणारा आहे. याचे कारण कोरोनाच्या काळात उद्योग-व्यवसायांना बसलेला फटका! याची पुनरावृत्ती आता कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या बाबतीत झाल्यास हे उद्योग सावरणे कठीण होईल. कोरोनाकाळात अफवांना जोर आला होता. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अफवांचे पेव फुटणे परवडणारे नाही. तो धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली हे स्वागतार्ह आहे. बर्ड फ्लू कोणत्याही पक्ष्यापासून पसरु शकतो. वेगवेगळ्या मोसमात देशातील पक्षी परदेशात जातात, तेथील पक्षी तात्पुरत्या स्वरुपात येथे स्थलांतर करतात. अशावेळी रोगाचा प्रसार कसाही होऊ शकतो. केवळ कोंबड्यांपासून बर्ड फ्लू पसरतो हा गैरसमज अनेकांच्या मनात रुजला आहे. अर्थात कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू पसरण्याचे प्रमाण सर्वाधिक दिसते.

व्यवसायावर संकट

या रोगात पक्ष्यांना सर्दी होते आणि श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू होतो. पक्ष्यांकडून माणसाकडे बर्ड फ्लू संक्रमित होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र गैरसमजातून तसे मानले जाते आणि याच मानसिकतेतून चिकन, अंडी खाणे टाळले जाते. किमान सत्तर अंश सेल्सिअस एवढ्या तपमानात कोंबडी शिजवल्यास कोंबडीत बर्ड फ्लूचा जंतू असलाच तर तो मरून जातो. मात्र भीतीपोटी चिकन खाणे थांबविले जात असल्याने दर झपाट्याने खाली येऊ लागतात आणि व्यावसायिकांना प्रचंड नुकसानीला तोंड द्यावे लागते. ज्या-ज्यावेळी बर्ड फ्लूची साथ आली तेव्हा-तेव्हा या व्यावसायिकांना मोठा फटका बसला. 2006 मध्ये बर्ड फ्लूने थैमान घातले होते. तेव्हा पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले. आताही चिकनचे दर घसरले आहेत. पोल्ट्री उद्योग 20 हजार कोटी रुपयांच्या पुढे आहे. सुमारे वीस लाख रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहेत. यावर्षी अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असल्याने पूरक उद्योग म्हणून ग्रामीण भागातील असंख्य तरुण कुक्कुटपालनाकडे वळले. त्यासाठी अनेकांनी बँकांच्या कर्जाचा आधार घेतला. ते आता संकटात सापडले आहेत. कोरोनाकाळात रोजगार, व्यवसाय, उद्योग यावर झालेला परिणाम लक्षात घेऊन कर्जाचे हप्ते भरण्यास सवलत देण्यात आली. त्याच सवलतीची आज पोल्ट्री व्यावसायिकांना अपेक्षा आहे. नव्हे, ती त्यांची गरज आहे. दिल्लीत बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यावर तेथे गाझीपूरमधील कोंबड्यांचा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले. घाईगडबडीत आणि कोणत्याही निष्कर्षाशिवाय उचलले गेलेले हे पाऊल नागरिकांच्या मनातील भीती वाढविण्यास कारण ठरले. केंद्राने आता दिल्ली सरकारला बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना दिली आहे. पोल्ट्रीजन्य पदार्थांची बाजारपेठ बंद ठेवता येणार नाही, असे केंद्रीय पशुधन, दुग्धविकास मंत्री गिरिराज सिंह यांनी स्पष्ट केले आहे. बर्ड फ्लूवर लस उपलब्ध आहे. शिवाय पोल्ट्री बाजारपेठांचे निर्जंतुुकीकरण, हा आवश्यक उपाय आहे. त्याचवेळी घाबरुन जाऊन अथवा नुकसानीच्या भीतीने आजारी कोंबड्यांची माहिती व्यावसायिकांकडून लपवली जाऊ नये. नुकसान झालेल्या पोल्ट्री चालकांना भरपाई दिली जाईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारकडून शोध मोहीम राबविण्यास सुरुवात होत असून पोल्ट्री व्यावसायिकांनी यात सहकार्य करणे गरजेचे आहे. बर्ड फ्लूबद्दल गैरसमज नकोत, मात्र खबरदारीला पर्याय नाही.

ज्या- ज्यावेळी बर्ड फ्लूची साथ आली तेव्हा तेव्हा या व्यावसायिकांना मोठा फटका बसला. 2006 मध्ये बर्ड फ्लूने थैमान घातले होते. तेव्हा पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले. आताही चिकनचे दर घसरले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा