मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यासाठी ‘सीरम’कडून कोरोना प्रतिबंधित लशीचे 9 लाख 63 हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 511 ठिकाणी लशीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर 7 लाख 84 हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात 3 हजार 135 शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी मंगळवारी दिली.

केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर कोरोना लशीकरण तज्ज्ञांचा गट स्थापन केला आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यातही कोरोना लशीकरणाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. लशीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरवण्यात आला असून, पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी आहेत. यामध्ये शासकीय व खासगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचार्‍यांचा लशीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलिस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, महापालिका कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.

सात लाख ८४ हजारांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी

’कोविन’ पोर्टलवर आरोग्य कर्मचार्‍यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 7 लाख 84 हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची नोंदणी करण्यात आली आहे. राज्यात शीतगृहाची पुरेशी उपलब्धता असून, राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर नऊ, जिल्हा स्तरावर 34, महापालिका स्तरावर 27 शीतगृहे तयार आहेत.

एका ठिकाणी किमान १०० जणांचे लशीकरण

आरोग्य सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांच्या लशीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यावरील विविध शासकीय आरोग्य संस्था स्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी किमान 100 जणांना लशीकरण करण्यात येईल. लशीकरणासाठीच्या पथकामध्ये 5 सदस्यांचा समावेश असणार आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा