ऊर्मिला राजोपाध्ये

सळसळत्या तारुण्याचा काळ उत्तुंग विचारांनी भारलेला असल्यास हातून अलैकिक कार्य घडण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच स्वामी विवेकानंदांसारख्या महनीयांचे विचार, त्यातली खोली या वयातच जाणून घ्यायला हवी. हा काळ आत्मिक उन्नतीच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा असं मानणार्‍या प्रत्येक युवक-युवतीने विवेकानंद यांचं अंतरंग जाणावं. युवक दिन म्हणून साजर्‍या होणार्‍या या विशेष दिनानिमित्त जागवलेली आठवण.

इतिहासाने 12 जानेवारी 1863 या दिवसाची नोंद घेतली कारण त्या दिवशी एका महात्म्याचा जन्म झाला होता. परकीय आक्रमणांनी गांजलेल्या, सततच्या दुष्काळांनी शिणलेल्या त्या काळात एका तेजोपुरुषाचा जन्म होणं ही उज्ज्वल भविष्याची नांदीच म्हणावी लागेल. या दिवशी जन्मलेल्या नरेंद्रनाथ दत्त नामक या ओजस्वी कुडीला नियतीने अल्पायुष्य दिलं, मात्र त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शित करण्याची क्षमता आहे. या कालातीत विचारधारेमुळेच स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन ‘युवक दिन’ म्हणून साजरा करणं औचित्यपूर्ण ठरतं. स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण चरित्र वेधक आहे. आपल्या तोकड्या आयुर्मानात एखादा माणूस वैश्विक पातळीवर किती मोठी ओळख मिळवू शकतो, हे त्यांच्या चरित्रवाचनातून समजतं. त्यांची भारदस्त छबी आजच्या सेल्फीप्रेमी युवकवर्गालाही भारावून टाकते. आजही ग्रंथालयांमध्ये त्यांच्या ग्रंथांची, पुस्तकांची पारायणं होतात.

तारुण्य उत्साहाने सळसळत असतं. आयुष्यातला वसंत मानला जाणारा हा काळ उत्तुंग विचारांनी भारलेला असेल तर हातून अलैकिक कार्य घडण्याची शक्यता बरीच जास्त असते. म्हणूनच स्वामी विवेकानंदांसारख्या महनीयांचे विचार, त्यातली घनता, खोली या वयातच जाणून घ्यायला हवी. शरीर आणि मनाची उत्तम साथ असलेला हा काळ शिक्षण, कारकिर्द आणि अर्थार्जन या त्रिसूत्रीबरोबर आत्मिक उन्नतीच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा असं मानणार्‍या प्रत्येक युवक-युवतीने विवेकानंद नामक विभूतीचं अंतरंग जाणून घेणं गरजेचं आहे. कारण स्वामी विवेकानंदांच्या विचारांमध्ये प्रत्येकाच्या मनातल्या चेतनेला, भावनेला, सहिष्णूतेला, अस्मितेला हात घालण्याची ताकद आहे. तो शक्ती, बुद्धी आणि विवेकाचा सुरेख संगम असणारा एक घाट आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातली रंजकता त्यांच्या जन्मापासूनच सुरू होते. अतिशय श्रीमंत घरात जन्मलेल्या नरेंद्रने वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत ख्यालीखुशालीतलं बालपण अनुभवलं. विश्वनाथबाबू आणि भुवनेश्वरी या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या नरेंद्रला घरात वाचन, लेखन, कला यांचेही संस्कार मिळाले. लहान वयातच नरेंद्र पखवाज आणि तबला वाजवायला शिकवायला शिकला. ध्रुपद गायकी शिकला. तो उत्तम स्वयंपाक करायचा. मनोहारी आणि मौलिक बोलायचा. त्याला पित्याकडून कला आणि मातेकडून प्रखर स्मरणशक्तीचा वारसा मिळाला होता. त्याने परिश्रमपूर्वक गतिमान वाचण्याची कला अवगत केली होती. पानातली पहिली आणि शेवटची ओळ वाचल्यानंतर आणि बाकीच्या मजकुरावरून धावती नजर फिरवल्यावरही संपूर्ण तपशील त्याच्या क्षणात लक्षात यायचा. कुशाग्र बुद्धीला तो देवाचं वरदान न मानता प्रयत्नांती मिळणारं फळ समजायचा. त्याच्याभोवती सतत मित्रांचं वलय होतं. पण घरालाच एक शाप होता. या घरात विरक्तीचं वारं वहायचं. त्याचे काका तरुणपणीच बायको आणि मुलाला सोडून संन्यासी झाले होते. नरेंद्रमध्येही नकळतपणे ही झाक दिसत होती.

हा प्रश्न त्याने भेटेल त्या महात्म्याला विचारला आणि ईश्वरप्राप्तीसाठी प्रत्येकाचा जन्म आहे हे उत्तर मिळाल्यावर ‘मग तुम्हाला ईश्वर दिसलाय का?’ असा प्रतिप्रश्न केला. अर्थातच कोणीच या प्रश्नाचं खंबीर उत्तर दिलं नाही. याच कारणामुळे त्यानं ब्राह्मो समाजाचं स्वीकारलेलं सदस्यत्त्वही त्यागलं आणि अशाच अवस्थेत असताना सुरेंद्रनाथ मित्र नावाच्या साधकांकडे रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्रची पहिली भेट झाली. ठाकूरजींना पाहिल्यावर पहिल्या भेटीत ‘हा कोणी पागल म्हातारा आहे’ अशी त्यांची धारणा झाली होती. नरेंद्रनी ठाकूरानांही तुम्ही ईश्वर पाहिलायं का हा प्रश्न विचारला आणि, ‘हो, मी ईश्वराला पाहिलंय’ असं उत्तर मिळालं आणि त्यांना एक नवा प्रकाश भेटला. गुरुचं मार्गदर्शन लाभल्यावर नरेंद्रच्या विचारांना वेगळीच धार आली. ठाकूरजींनी नरेंद्रला दिव्यानुभूती दिली.

त्यांनी तब्बल अडीच वर्षं परिक्रमा केली. सर्वधर्म परिषदेसाठी जावं असा आदेश गुरुंकडून मिळाल्यानंतर देणगीस्वरुपात गोळ्या केलेल्या अर्थसहाय्याने त्यांनी प्रवासाची तयारी केली. याच सुमारास जिवलग मित्र आणि खेतडीचे संस्थानिक अजित सिंग यांच्या मुलाच्या जन्मानिमित्त असलेल्या सोहळ्यानिमित्त त्यांना खेतडीस जावं लागलं. या अजितसिंगानींच त्यांना अर्थसहाय्य केलं आणि ‘विवेकानंद’ ही नवी उपाधी दिली. शिकागोपर्यंतच्या प्रवासात त्यांची जमशेदजी टाटांची भेट झाली. ते चीनला गेले, जपानला गेले आणि कॅनडामार्गे शिकागोला पोहोचले. मात्र संन्यस्थ अवस्थेत काहीच सांभाळण्याची सवय नसताना बरोबर होतं-नव्हतं ते सगळं गमावलं. शिकागोत राहण्याची आणि खाण्यापिण्याची भ्रांत होती. मात्र दैवी चमत्कारच म्हणावा लागेल की, एका स्त्रीनं स्वत:च्या घरात राहण्याची व्यवस्था केली आणि प्रो. राईट यांनी या परिषदेत विवेकानंदांचं व्याख्यान होईल, अशी व्यवस्था केली. हा संपूर्ण कटकटीचा आणि तणावाचा काळ असूनही स्वामीजींनी ‘माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो’ या पहिल्या वाक्यानेच श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आणि संपूर्ण परिषदेवर अधिराज्य गाजवलं.

स्वामीजींचा एकूणच जीवनक्रम तरुणांसाठी दिशादर्शक आहे. ‘मी मनाचं ऐकत नाही तर मन माझं ऐकतं’ हा आत्मविश्वास असलेल्या स्वामीजींनी नेहमीच बलदंड शरीर आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा आणि गुरुचं ऋण मानलं. शेवटपर्यंत आजार आणि कौटुंबिक कलहाचा सामना करत असूनही त्यांनी साधकांना राष्ट्रप्रेमाचे धडे दिले. त्यांच्यात चैतन्य जागृत केलं. ‘मातीत खेळल्यानं मन आणि मती स्थिर होते’, ‘रुबाबशीर व्यक्तिमत्त्व आणि योग्य देहबोली याने प्रभाव पडतो’ हे त्यांचे विचार आजच्या काळालाही लागू पडतात.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा