शेतकर्‍यांचा अंत पाहू नये

स्वामिनिष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा महत्त्वाची असते. जुलमाविरुद्ध व सामुदायिक जीवन हवार करण्याची एक कृती म्हणजे केंद्र सरकारचे शेती व कामगार कायदे आहेत. हरियाणा, पंजाब राज्यांतील शेतकर्‍यांचे लढे हे चिरंतन मूल्य जपण्यासाठी आहेत. या लढ्यामध्ये कोणीही नायक नाही; पण देशात हरियाणाच्या कर्नाल येथे झालेला लाठीमार हा हळूहळू आंदोलन बिघडविण्याचा कट सरकार करीत आहे. यातून सामुदायिक लढा उभा राहील. दीड महिना वाटाघाटीचा घोळ घालून तेच तेच समर्थनाचे मुद्दे शेतकर्‍यांच्या गळी मारून मार्ग निघणार नाही, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावे. हा देश अन्नधान्य, शेतीमाल, फळ उत्पादकांचा आहे. देशभर, शेती कायद्यातील तरतुदी पाहून, जो उद्रेक झाला आहे, त्याचा अंत पाहू नये. महाराष्ट्रात तर किरकोळ बाबींवर भाजप नेते व त्यांचे प्रवक्ते टीका करतात व उठसूठ आघाडी सरकारवर शेरेबाजी करतात, हे केवळ ‘आम्ही राजकीयदृष्ट्या जिवंत आहोत’ हे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न आहे. सत्ता गेल्यामुळे व ठाकरे सरकारला विरोध करण्यासाठी, जनहिताचे मुद्दे नसल्यामुळे ‘सुरक्षेत कपात’ हा मुद्दा उचलल्याचे दिसते. कोरोनावर मात करण्यासाठी आघाडी सरकार दिवस-रात्र राबत असता, असे मुद्दे काढून प्रसार-माध्यमांकडे धाव घेणे योग्य नाही.

अ‍ॅड. म. वि. अकोलकर, पुणे.

नव्या कोरोनाबाबत दक्षता हवी

सध्या कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले, तरी ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाने सर्वच देशांना हादरून टाकलेले दिसते. ब्रिटनबरोबरच इतर देशांत नव्या कोरोनाची रुग्णसंख्या भारतातदेखील वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा उपायांबाबतीत नागरिक गंभीर नसल्याचे दिसून येते. त्यासाठी कोरोना नियमांची कठोरातील कठोर अंमलबजावणी करून पुनश्च जनजागृती करणे गरजेचे आहे. नव्या कोरोनावरची लस जोपर्यंत विकसित होत नाही, तोपर्यंत नियमांचे पालन केले पाहिजे.

अमोल जगताप, पुणे

कचराकुंडीचे स्वरूप…..

सर्व्हे नं.- 11/ 3, आंबेगाव बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या समोरील मोकळ्या प्लॉटमध्ये कचरा टाकण्यात येत असल्यामुळे दुर्गंध येत आहे. त्यामुळे कचरा अनेकदा जाळला जात आहे. अनेक जण मुतारी म्हणूनही वापर करत आहेत. हा भाग महापालिकेत समाविष्ट झाला आहे.
तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेऊन, स्वच्छता करून स्थानिक नागरिकांची डास-चिलटे व दुर्गंधी पासून मुक्तता करावी.

अनिल बाळासाहेब अगावणे, पुणे.

संभाजीनगर नामकरण योग्यच

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष तसेच स्थानिक तथा मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या एमआयएम पक्षानेदेखील औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करू नये म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तिकडे मनसे पक्षदेखील नामकरण विषयावर कमालीचा आक्रमक झाला आहे. शहराचे नामकरण करणे हा त्या त्या राज्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे यापूर्वी न्यायालयाने स्पष्ट केले आहे. देशात अलीकडेच दिल्ली व उत्तर प्रदेशमध्ये मुघल सम्राटांची नावे बदलण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. तेव्हा वीर छत्रपती संभाजीराजे यांचे प्रचंड हिम्मत व शौर्य पाहता औरंगाबाद शहराचे वीर संभाजीनगर असे नामकरण करणे योग्य होईल.

संजय गंगाराम साळगांवकर, कुर्ला, मुंबई

दंड भरू पण नियम तोडू !

आम्हीच आमच्या देशाला अर्थप्राप्ती करून देतो. कसे ते पाहा. आम्ही वाहतूक नियमभंग करून आमच्या सरकारला रू. 69 कोटी 60 लाख 35 हजार 400 रुपये मिळवून दिले. आम्ही सरकारचे आभारी आहोत की सरकारने आम्हाला दंडरूपाने का होईना देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावायची संधी दिली. नियमभंग करणारे 18 लाख 87 हजार देशबंधू-भगिनी आहेत. या सर्वांवर नियमभंगाचे निरनिराळे 14,66,002 गुन्हे आहेत. यावरून असे लक्षात येते की आम्ही दंड भरू पण नियमाने वागणार नाही!

गोपाळ द. संत, पुणे

चालकरहित मेट्रो

मानवरहित पहिल्या मेट्रो रेल्वेला पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात झाली. सध्या ताशी 85 किलोमीटर वेगाने धावू शकणार्‍या मेट्रोमुळे भारताने विनाचालक रेल्वे धावणार्‍या देशांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळविला आहे. सन 1981 मध्ये जपानमध्ये कोबे शहरात पहिली मानवरहित रेल्वे वाहतूक सुरू झाली. त्यानंतर फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका, इटली, यांसारख्या बर्‍याच पाश्चिमात्य देशांत मानवराहित रेल्वे वाहतूक सुरू आहे. मेट्रोच्या इंजिन आणि डब्यांमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे गाडीच्या प्रवासाचे नियमन केले जाणार आहे. गाडीचे संचालन, वेग, दरवाजांची उघडझाप, तसेच आपत्कालीन यंत्रणाही स्वयंचलित असणार आहे. समोरील मार्गात काही अडथळे ओळखून गाडी आपोआप थांबणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवरहित मेट्रो देशात कार्यरत होण्यास जरी पाश्चात्य देशांच्या मानाने उशीर झाला असला, तरीही यापुढे ह्या मेट्रोचे जाळे देशाच्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा उत्तम दुवा ठरणार आहे. वाहतूक कोंडी, वाहनांच्या वर्दळीचे आवाज, हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे.

स्नेहा राज, गोरेगाव.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा