जीवन अध्यात्म : डॉ. जगन्नाथ श्यामराव पाटील

ईश्वराचा साक्षात्कार होणे, प्रचीती मिळणे म्हणजे काय ? आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ? आत्मबोध काय ? विश्वामध्ये, संसारात, प्रपंचात प्रयत्नाशिवाय, संघर्षाशिवाय, कष्टाशिवाय काही प्राप्त होत नाही. कित्येक पिढ्यांनी पूर्वजांनी, शास्त्रज्ञांनी, विद्वानांनी नवे शोध लावले. विविध क्षेत्रात प्रगती केली त्याचा उपयोग आणि उपभोग आम्ही घेत आहोत. पैसा कमावण्यासाठी प्रयत्न, घर मिळविण्यासाठी प्रयत्न. सतत प्रयत्न करणे. याची मानवाला सवयच लागली. काहीही प्राप्त करावयाचे झाले की तो प्रयत्न चालु करतो. ईश्वरप्राप्तीसाठीही तो भरपूर प्रयत्न चालु करतो. परंतु परमेश्वर प्रयत्नाने आणि शोधण्याने मिळत नाही हे मानवाला कळलेच नाही. कारण तो कुठे हरवला नाही की त्याला शोधावे. वास्तवीक आपल्यामध्येच ईश्वर आहे. फक्त पहाण्याची, जाणण्याची, समजण्याची गरज आहे. त्याला फक्त उठवायचे आहे. प्रयत्न करायचे नाहीत तर प्रयत्न सोडायचे आहेत. सगळे प्रयत्न सोडून चित्तवृत्ती शांत केल्या आणि जागृतावस्था ठेवली की साक्षात्कार होतो असे मला वाटते. प्रयत्न करणारे लोक सतत प्रयत्न करीत राहिल्यामुळे तणावग्रस्त होतात. ताण-तणावाबरोबरच मनामध्ये भावभावनांचे तरंग निर्माण होतात. प्रेम, द्वेष, मोह, सुख-दु:ख असे विविध आणि गुंतागुंतीचे भाव मनात तयार होतात. तर्क, वितर्क, कुतर्क यांची निर्मीती होते. त्यामुळे स्वत:मधल्या भगवंताचे दर्शनच होत नाही. आत्मस्वरुपाचे ज्ञान होत नाही. प्रयत्न, संघर्ष करणारे गर्व, अहंकार, संताप अशा भावनांनी लिप्त होतात. मालकत्व, कर्तेपणा, मीपणा निर्माण होतो. तिथेच साधकांची भटकंती चालु होते. मुळ मार्गापासून तो विचलित होतो. ईश्वरप्राप्ती आणि संसार, प्रपंच हे दोन्ही मार्ग अतिशय भिन्न आहेत. जात, पंथ, धर्म, विचार, कृती, लक्ष्य, स्वप्नरंजन, महत्त्वकांक्षा, मान, सन्मान, प्रतीष्ठा या सर्वांपासून मनाला मुक्त करून केवळ त्याग, समर्पण, शरणागत भावनेने चित्तवृत्ती शांत ठेवली तर आत्मसाक्षात्कार होणे सहज शक्य आहे आणि मग स्व’ मधल्या आत्मतत्त्वाचा बोध होतो आणि आत्मसाक्षात्कार होतो. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ ही संसारामधली म्हण आहे. समर्पणात परमेश्वर हे आध्यात्म आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा