न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म राजस्तानमधील जयपुरजवळील मल्हारगड येथे झाला; मात्र त्यांचे सगळे आयुष्य पुण्यामध्ये गेले. काकासाहेब गाडगीळ शनिवार पेठेतल्या मेहुणपुरामध्ये पुण्यात राहत. तसं पाहिलं तर काका गाडगीळ पुणे शहराची शान होती. खादीचे धोतर, नेहरू शर्ट, गांधी टोपी, पायात वहाणा. कधी कधी काळे जॅकेट. असा त्यांचा साधा पेहराव असे.

काकासाहेबांचे ते वैशिष्ट्य म्हणजे गप्पिष्ट होते. त्यांचे गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणजे नगरवाचन मंदिराच्या अंगणातील बाकडे! या ठिकाणी गप्पांचा अड्डा जमत असे! गप्पांच्या अड्ड्यामध्ये श्री. ज. जोशी, वि. स. माडीवाले -पत्रकार. ही मंडळी काय बोलतात म्हणून मी बर्‍याच वेळेला हजर असे. काकासाहेब यांचा दर आठवड्याच्या ‘केसरी’मध्ये त्यांचे खास पत्रकार मित्र माडीवाले- (बिकट वाट हे आत्मचरित्र लिहिणारे) काकासाहेबांच्या विचारांचे शब्दांकन करून रविवारचा ‘केसरी’मध्ये लेख प्रसिद्ध होत असे. त्यामुळे रविवार केसरी हे पुणेकरांचे आकर्षण बनले होते! ‘दैनिक सकाळ’चे संपादक नानासाहेब परुळेकर आणि काकासाहेब गाडगीळ यांचा मात्र 36 चा आकडा होता. असं सांगितलं जातं.

काकांचा एकसष्टी समारंभ हिराबागेच्या मैदानावर साजरा झालेला मला आठवतो. त्या ठिकाणी एस. एम. जोशी प्रमुख वक्ते होते. पूर्वीची समाजवादी मंडळी त्या वेळेला काँग्रेसमध्येे होती. एस. एम. जोशींची एम. ए.ची फी भरण्यासाठी आनंदीबाई गाडगीळांनी आपल्या हातातील पाटल्या काढून दिलेल्या होत्या. एस. एम. जोशी काकासाहेबांच्या समारंभास हजर होते. नव्हे वक्ते पण होते. हा झाला काकासाहेबांच्या जीवनाचा थोडासा आढावा त्यांनी स्वतःच्या ‘पथिक ’ नावाने आत्मचरित्रात घेतला आहे.

ज्या वेळेला आचार्य अत्र्यांनी नवयुग काढला त्या वेळेला आचार्य अत्रे काकांच्याकडे गेले आणि ‘काका, तुम्ही अतिशय छान प्रसन्नपणे दिलखुलास बोलता. तुम्ही लिहा’ असे म्हणाले. नवयुगमध्ये त्यांचा ‘डिकसळच्या धुळीत’ एक विनोदी लेख नवयुगमध्ये प्रसिद्ध झाला. त्या वेळेपासून लेखक काका गाडगीळ अशी त्यांची प्रसिद्धी होऊ लागली. नवयुगमधून भरपूर लेखन काकासाहेबांनी केलं. काकासाहेब यांचे गाजलेले ‘ग्यानबाचे अर्थशास्त्र’ हे पुस्तकदेखील खूपच प्रसिद्ध आहे. काकासाहेब सांगत असत की आचार्य अत्रे यांनी मला लेखक केले! 1962 मध्ये सातारच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद काकासाहेबांना बहाल करण्यात आल्यावर काकासाहेब गाडगीळ कृतज्ञतेने ‘आचार्य अत्रे यांनी मला लेखक केल्यामुळेच या पदापर्यंत मी पोहोचलो’ अशा शब्दांत आचार्य अत्रे यांचे आभार मानले.

दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये काकासाहेब गाडगीळांनी काही साहित्यिकांना आपल्या घरी मेजवानी दिली. जेवणात कढी केली होती. आचार्य अत्रे यांना कढी इतकी आवडली की त्यांनी पांच-सहा वाट्या कढी प्यायली व म्हणाले, की काका, तुमची कढी अतिशय छान आहे ! त्यावर काकासाहेब गाडगीळ म्हणाले- इथे तुम्ही म्हणताय काकांची कढी चांगली आहे; पण महाराष्ट्रात- पुण्याला- गेल्यावर काकांची कढी पातळ होती, असे सांगाल!

1953 मध्ये श्यामची आई चित्रपटाला सुवर्ण पदक मिळाले. त्या वेळेला शनिवारवाड्यासमोर आचार्य अत्र्यांचा पुणेकर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. त्या सत्कारसभेत बोलताना काकासाहेब गाडगीळ खांदे उडवीत म्हणाले, आचार्य अत्र्यांनी श्यामची आई अगदी कोकणातली- फार उंच नाही ,! फार जाड नाही ! फार काटकुळी नाही! ठेंगणी-ठुसकी अगदी कोकणातली बाई शोभेल अशी श्यामची आई दाखवून मराठी माणसांवर आणि कोकणी माणसांवर फार मोठे उपकार केले आहेत.

1957 मध्ये काकासाहेब गाडगीळ यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यपालपदी नेमणूक स्वीकारण्याची विनंती केली गेली, त्या वेळेला पत्रकारांनी त्यांना विचारले की काका तुम्हाला मंत्रिपद आवडते का राज्यपालपद ! काका साहेबांनी अर्थातच मत्रिपद आवडत असल्याचे सर्वांना सांगितले. म्हणाले, मला पुण्याची पाटीलकी प्यारी आहे. नंतरच्या काळामध्ये काकांना राजकीय संन्यास घ्यायची वेळ आली त्या वेळेला काका म्हणाले ‘काका मायनस राजकारण इज इक्वल टू मेहुणपुर्‍यातील वकील!’ राजकारण आणि प्रेम यामधला फरक सांगताना करायचं असतं पण बोलायचं नसतं ते प्रेम ! आणि बोलायचं असतं पण करायचं नसतं ते राजकारण ! असे ते म्हणत.

शेण खाणे असा मराठीमध्ये एक विशिष्ट अर्थाचा वाक्प्रयोग आहे! त्याबद्दल काकासाहेब गाडगीळ म्हणत, एकट्याने खाल्ले ते शेण व सर्वांनी खाल्ले ती श्रावणी- ते पंचगव्य-गोमय ! सामुदायिकपणे खाल्ले जाते त्याला श्रावणी म्हणतात आणि एकट्याने खाल्लेले शेण होय ! असे काही विनोद सांगून काकासाहेब गप्पांच्या अड्ड्यात हशा पिकवत. काकासाहेबांनी हसत हसत रेशमी चिमटे घेऊन जनतेला जे सांगितले ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. काकासाहेब यांना सत्तर वर्षांचे आयुष्य लाभले. पण त्यांच्या जन्म आणि मृत्यूमध्ये दोनच दिवसांचे अंतर आहे. जन्म 10 जानेवारी 1896 – आणि मृत्यू 12 जानेवारी 1966 रोजी झाला. काकासाहेब गाडगीळ पुणे शहराचे भूषण आणि वैभवदेखील होते!

अ‍ॅड. बाबूराव कानडे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा