नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूविरुद्ध लसीकरण मोहिमेने वेग घेतलेला दिसतोय. १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. आज सकाळी साधारणपणे पाच वाजता पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लशीचे डोस कंटेनरद्वारे दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. ही लस घेऊन ‘स्पाईस जेट’चे विमान सकाळी दहाच्या सुमारास दिल्ली विमानतळावर दाखल झाले.

पुणे विमानतळावरून दिल्लीसहीत देशातील १३ ठिकाणी या लशीचे कंटेनर पाठवण्यात आले आहेत. आज दुपारपर्यंत लशींचे कंटेनर वेगवेगळ्या शहरांत दाखल होतील. यात अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, कर्नाल, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. मुंबईसाठी रस्ते मार्गाने लशींचे डोस पाठवण्यात आले.

सीरम इन्स्टिट्युटपासून वेगवेगळ्या स्थळ लशी योग्य रितीने पोहचवण्यासाठी ‘कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेड’च्या ट्रकांचा वापर करण्यात आला आहे.१६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्राकडून ‘सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’सोबत ५.६ कोटी लशींचे डोस खरेदी करण्याचा करार करण्यात आला आहे. ११ जानेवारी रोजी ‘सीरम’कडून १.१ कोटी लशीचे डोस खरेदी करण्यात आले. एप्रिल २०२१ पर्यंत आणखी ४.५ कोटी डोस खरेदी करण्यात येणार आहेत. या लशीच्या प्रत्येक डोसची किंमत २०० रुपये निर्धारित करण्यात आलीय. केंद्राकडून सीरम आणि ‘भारत बायोटेक’ला कोव्हिड १९ च्या लशींचे सहा कोटींहून अधिक डोस खरेदी करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा