मोरेंना : विषारी दारु पिल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात घडली. सात जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मोरेनाचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी दिली.

मोनेर जिल्ह्यातील दोन गावांमध्ये या घटना घडल्या आहेत. पहावली आणि मनिपूर अशी या गावांची नाव असून, पहावलीतील तीन, तर मनिपूरमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. इतर सात जण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने तिला ग्वालियरला हलवले आहे.

विषबाधा झालेली दारू देशी बनावटीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. दारू प्राशन केलेल्या लोकांना मध्यरात्री उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले. यातील दहा जणांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे रुग्णालयात दाखल करताना समोर आले. तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मोरेना जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गोंधळ घातला. रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन जाण्याचा आग्रह रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाईकांना करण्यात आला. मात्र, ट्रॅक्टरमधूनच मृतदेह घेऊन जाऊ, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यावरून गोंधळ झाला.

अशा घटना घडल्यानंतर कारवाई करण्यात येते. मात्र, या दारूची विक्री थांबवण्यासाठी का प्रयत्न केले जात नाहीत. पोलिसांसह यात अधिकारी सहभागी असल्याचा आरोप कुटुंबीयांच्या नातेवाईकांकडून यावेळी करण्यात आला. हे नातेवाईक मंगळवारी सकाळी रुग्णालयात पोहोचले होते. देशी दारू गावात सहज उपलब्ध होते आणि त्यावर पोलीस कारवाई करत नाही, असे नातेवाईकांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा