मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सुरक्षेत कपात केल्याने ठाकरे सरकारवर टीकाही होत आहे. ठाकरे सरकारने सुडाच्या भावनेतून हा निर्णय घेतला आहे, अशी टीका भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतःची सुरक्षा कमी करण्यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दूरध्वनी केला. देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली.

देशमुख म्हणाले, गरज नसल्यास माझी सुरक्षा कमी करण्यात यावी, असे पवार यांनी फोन करून सांगितले. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या जिवाला किती धोका आहे यावरून सुरक्षा ठरवली जाते. नुकत्याच एका समितीच्या अहवालावरून अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधी पक्षाचा आहे म्हणून सुरक्षा कमी केलेली नाही. समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री आशिष शेलार, दीपक केसरकर, माजी राज्यपाल राम नाईक, फडणवीस यांच्या पत्नी अमृता व कन्या दिविजा यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडीही काढली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयात सरकारची बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ केली आहे. तर भाजपचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, राजकुमार बडोले, शोभाताई फडणवीस, अंबरिष आत्राम, सुधीर मुनगंटीवार, आमदार राम कदम, प्रसाद लाड, माधव भंडारी, मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष कृपा शंकर सिंह यांचे पोलिस संरक्षण काढण्यात आले आहे. दुसरीकडे, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विजय वडेट्टीवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा