संदेश जीवन विद्येचा : वामनराव पै

आपले जीवन सुखी होणे ही गोष्ट आपल्या हातात आहे व आपण दुःखी होणे ही गोष्ट सुद्धा आपल्याच हातात आहे. माणूस हा दुःखी होतो पण सुखी होत नाही. संसार हे आपल्या दुःखाचे मूळ नाही तर अज्ञान हे आपल्या दुःखाचे मूळ आहे. पुष्कळ लोकांना असे वाटते की आपल्या दुःखाला कारण बायकामुले, उदयोगधंदा आहे. दुःखाचे मूळ हे अहंकार आहे. आज जगांत जे दुःख भरलेले आहे त्याचे कारण अहंकार आहे.कुठेतरी भांडण,तंटेबखेडे चाललेले असतात त्याचे मूळ हे अहंकारात असते. हिटलरला आपल्या वंशाचा अहंकार होता. हा अहंकार इतका पराकोटीचा होता की त्याने इतर वंशाच्या लोकांचा द्वेष केला.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या कंठी झोंबे इथे अहंकाराचे नवल काय ते बघा. विद्वानाच्यापाठी हा अहंकार जास्त असतो. हयांत आम्ही थोडेसे सांगतो ते म्हणजे विद्वानाला विद्वतेचा अहंकार असतोच पण अज्ञानाच्या ठिकाणी हा अहंकार कमी असतो असे नाही. लहान मुलाकडेही अहंकार असतो व ़मोठया माणसाकडेही अहंकार असतो. घरातल्या मोठया माणसांना असे वाटते की आम्ही आता वृद्ध झालो, घरातल्या सर्वांनी आमचा मान ठेवला पाहिजे. घरातल्या लोकांनी सगळया गोष्टी आम्हांला विचारून केल्या पाहिजेत असे त्यांना वाटते. इथे अज्ञान सज्ञान असा भेद नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी हा अहंकार असतो. हा अहंकार असण्याचे कारण म्हणजे आपल्याला स्वरूपाचा विसर झालेला आहे. देवाला तो विसरलेला आहे. देवाचा विसर झाला रे झाला की अहंकाराचे स्फुरण होते व देवाचा आठव झाला रे झाला की नमस्कार करतो. माझिये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते अहंकार गेला की प्रेम निर्माण होते. अहंकार असला की हा सर्वांचा द्वेष करतो, तिरस्कार करतो. सगळीकडे भांडण, तंटेबखेडे, युद्ध लढाया, दंगेधोपे हया सर्वांचे जे मूळ आहे ते अहंकारात आहे. हे अहंकाररूपी मूळ उखडून टाकायला कुणी बघत नाही कारण हे मूळ आहे हेच मुळी कुणाला ठावूक नाही. खरा सुक्ष्म अहंकार तर कुणालाच ठावूक नाही. विद्वतेचा अहंकार, पैशाचा अहंकार वगैरे स्थूल अहंकार आहेत तर देवाचा विसर हा सुक्ष्म अहंकार आहे. सर्व दुःखाचे मूळ हा अहंकार आहे व सर्व संतांनी तिथे बोट ठेवलेले आहे. अर्जुनपण न घेता, निशेष सांडिजे मीपणा तुमचे मीपण गळून पडले पाहिजे. कैरी पिकली की तिचाच आंबा होतो व आंबा देठापासून गळून पडतो. परिपक्व फळ हे देठापासून गळून पडते. तसा तुमच्याठिकाणी परमार्थ परिपक्व झाला पाहिजे, अध्यात्म परिपक्व झाले पाहिजे, भक्ती परिपक्व झाली पाहिजे व अहंकार गळून पडला पाहिजे.

(सौजन्य : जीवन विद्या मिशन)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा