शाळा बंद योग्य निर्णय

आजही जरी तुरळक वाटत असले, तरी मुंबईसह अन्य ठिकाणीही कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यात आत्ता कोरोनाच्या नव्या विषाणूंची निर्माण झालेली धास्ती, या सार्र्‍य पार्श्वभूमीवर मुंबईसह अन्य शाळाही 15 जानेवारी पर्यन्त बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे. जिथे आम्ही मोठी (काही) माणसं शिकली सवरलेली, समज उमज असूनही कोरोनाचे नियम, घ्यावयाची काळजी पाळताना दिसतोच असे नाही. तिथे शाळेतील लहान मुले कितपत काळजी घेतील, हात धुणे, अंतर ठेवणे हे सारे मुले सांभाळू शकतील का? त्यांना तेवढी समज आणि उमज असेल का किंवा शाळांना सर्वच मुलांना कंट्रोल करणे जमेल का ? तसे पाहता मार्चपासून राज्यातील मुलांच्या शिक्षणाची कोरोनाने परवड केली आहेच. तरी सुद्धा मुलांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे हा सारासार विचार केल्यास शाळा बंद ठेवणे हा निर्णय योग्य आहे, असेच वाटते.

विश्वनाथ पंडित, ठाणे

पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्त्व

ज्येष्ठ पत्रकार आदरणीय रामभाऊ जोशी यांनी नुकतेच शंभरीत पदार्पण केले. त्यांचे हार्दिक अभिनंदन. समाज जीवनाचा मोठा पट अनुभवलेले आणि लोकशाहीतील चवथ्या स्तंभाबरोबर दीर्घकाळ पत्रकारिता करताना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक उद्योग, कृषी या सर्वच क्षेत्रातील बदलास त्यांनी केलेले योगदान हे उल्लेखनीय आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन पत्रकारिता करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पारदर्शी वाचकाभिमुख पत्रकारिता रामभाऊ जोशींनी जपली आहे.

विजय देवधर, पुणे

नामांतराचा वाद

औरंगाबाद नामांतराचा प्रश्न गावातून गाजत आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे असा आग्रह नेते, काही पक्षश्रेष्ठी करताना दिसत आहेत. पक्षाचे कार्यकर्ते पण मागे नाहीत. त्या त्या गावाचे नाव त्या त्या वेळच्या परिस्थितीचा विचार करुन ठेवलेले असावे. कालांतराने त्यात विसंगती वाटते म्हणूनच औरंगाबादचे संभाजीनगर, तर बॉम्बे सेंट्रलचे नाना शंकरशेठ नामांतराचा आग्रह होतो. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आठवत असेलच. त्यावेळी विद्यापीठाचे मराठवाडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामांतर करुन समन्वय साधल्याचे सांगतात. नावात काय आहे? असे आग्रहपूर्वक सांगताना नाव बदलण्याचा हा विचार काहीना विसंगत वाटतो. नाव बदलायचे तर आधी ठेवलेल्या नावाला का नावं ठेवावी लागतात. मग नामांतर येते, असाही विचार काही मांडतात. कालांतराने नावं बदलणे श्रेयस्कर असलं, तरी याबाबतही मत मतांतरे असतात. जसे आठवलेंच्या पक्षाला नामांतर नको आहे. मग नावात काय आहे यावर विश्वास न ठेवता, श्रध्दा न ठेवता आता नाावातच सगळं आहे बदलत्या परिस्थितीत म्हणणे श्रेयस्कर !

शशिकांत हरिसंगम, बारामती

पराभवाची परतफेड

मेलबर्न येथील दुसर्‍या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने दणदणीत पराभव केला व अ‍ॅडलेड कसोटीत झालेली मानहानी (36 धावांचा नीचांक) या दवाबाखाली अजिंक्य व त्याचे सहकारी यांनी केलेला खेळ अप्रतिम होता. अजिंक्य रहाणे याचे कल्पक नेतृत्व व दमदार शतक, रवींद्र जडेजाची अष्टपैलू खेळी, नवोदित शुभमन गिल आणि सिराज यांचा जबाबदारीने केलेला खेळ व बुमराह-अश्विन यांची भेदक गालंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा निभाव लागला नाही. विराटच्या अनुपस्थितीत साकारलेला विजय नक्कीच भारतीय संघाला स्फूर्ती देणारा आहे.

माधव ताटके, पुणे.

बिबट्यांची संख्या वाढली

केंद्र सरकारने देशभरातील बिबट्यांच्या संख्येचा एका अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. देशात सर्वाधिक बिबटे मध्य प्रदेशात असून त्यांची संख्या 3421 एवढी आहे. त्याखालोखाल कर्नाटक व त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात बिबटे 1690 आहेत. 2014 मध्ये देशभरातील बिबट्यांची संख्या आठ हजारांच्या आसपास होती. गेल्या चार वर्षात म्हणजेच 2018 मध्ये ती 12852 वर पोहचली आहे. देशात मध्य भारत, पूर्व घाट, शिवालिक पर्वत, गंगेचे खोरे, पश्चिम घाट, ईशान्य पर्वत, तसेच ब्रह्मपुत्रेचे खोरे या भागात मुखत्वे बिबट्यांचे वस्तीस्थान आहे. गेल्या काही वर्षात वाघ, सिंह, तसेच बिबट्यांची संख्या वाढली आहे. यावरून हे आकडे भारतातील उदात्त वन्यजीवसंपदा आणि जैवविविधतेची साक्ष देत आहेत, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रात बिबट्यांच्या मृत्यूची संख्या वाढली आहे. राज्यात नोव्हेंबरपर्यंत 173 बिबट्यांचा मृत्यू झाला होता यापैकी काही मृत्यू अपघात व शिकार यामुळे झाले आहेत. अलीकडे अनेक बिबटे पाणी किंवा भक्ष्याच्या शोधात शहरात आल्याचे दिसते. त्यामुळे त्यांना जंगलातच सुरक्षित वातावरणात ठेवावयास हवे. मध्यंतरी एका बिबट्याने मराठवाड्यात कित्येक बळी घेतले होते. एकूणच जंगलातले बिबटे वाढले ही एक चांगली घटना असून, त्याचे संवर्धन करणे जरूरीचे आहे

शांताराम वाघ, पुणे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा