कोरोनाशी लढा ३४ : सुरेश मुरलीधर कोडीतकर

कोरोनाने व्यापलेले आणि ग्रासलेले सन 2020 हे वर्ष आता निघून गेले असून आपण सन 2021 या नव्या वर्षात कोरोनापासून मुक्तीची आस लावून बसलो आहोत. तसे होणार आहे का नाही हे अनिश्चित आहे. कारण परिणामकारक आणि किफायतशीर लस येणार असे संकेत डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहात मिळत असतानाच नव्या स्ट्रेनचा उगम झाला आहे. इंग्लंडहून तो एव्हाना सर्वत्र पसरलासुध्दा आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा तणावाचा सामना करावा लागत आहे. कोरोना विषाणू गाशा गुंडाळणार असे वाटत असतानाच त्याचा पुढील अवतार प्रगटेल असे कोणाच्या ध्यानीमनीही नसावे. थोडक्यात काय तर ही कोरोना विषाणूच्या निर्गमनाची हूल उठली आणि स्ट्रेनची चाहूल लागली आहे.

जुन्या वर्षाला निरोपाच्या आणि नव्या वर्षाच्या स्वागताच्या आनंदावर यामुळे विरजण पडले की नाही याचा अंदास घेण्यापेक्षा आता नव्या आव्हानाकडे आपण अधिक सजगपणे पहायला हवे. जैविक आपत्तीचे कोणतेही विषय हे आपण गांभीर्यानेच घ्यायला हवेत. कारण कोरोनाने प्रगत आणि आधुनिक राष्ट्रांनासुध्दा कसे गुडघे टेकायला लावले हे आपण गेल्या वर्षी पाहिले आहे. त्यामुळे त्रिसूत्रीची सावधानता अजूनही गरजेचीच आहे.

कोविड – 19 चा फैलाव गेल्या मार्चमध्ये सुरु झाल्यानंतर प्रथमतःच डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहात कोरोनाचे रुग्ण आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत मोठया प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून आले होते. उदाहरण द्यायचे झाले तर केरळात 1892, हरियानात 1989, छत्तीसगडमध्ये 2269, दिल्लीत 3705, पश्चिम बंगालमध्ये 4418 आणि महाराष्ट्रात 3288 इतके रुग्ण कमी झाले होते. तर बिहारमध्ये 245, तेलंगाना 241, ओरिसा 205 इतके रुग्ण कमी झाले होते. याला अपवाद होता तो फक्त दादरा, नगर, हवेली, दमण, दीवचा. तिथे किरकोळ वाढ नोंदवण्यात आली होती. सोमवारी 27 डिसेंबर 16143 नविन कोरोना संसर्गाचे रुग्ण समोर आले होते. जून 23 नंतर पहिल्यांदाच एक दिवसाचा हा किमान आकडा होता. त्याच दिवशी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या होती फक्त 251. सात महिन्यांपूर्वी, 2 जूननंतरचा हा किमान आकडा होता. देशातील बहुतांश राज्यात या सप्ताहात कोरोनाच्या केसमध्ये उतार पडत असल्याचे दिसून आले होते. कदाचित चाचण्या कमी झाल्यामुळे असे घडले असावे. एकुणात कोरोना काढता पाय घेत असल्याची चाहूल लागली होती; पण ती हूल ठरली. आगंतुक स्ट्रेनची चाहूल लागली.

नवे वर्ष नवा हर्ष घेऊन आले आता नव्या उत्साहाने आता कामाला लागू. कोरोनाची भिती काढून टाकू. असे स्वतःला बजावत असताना आणि तसा माहौल तयार होत असताना कोरोना विषाणूचा नवा अवतार इंग्लंडमध्ये दिसून आला. जनुकीय रचनेत बदल झालेला हा नवीन विषाणू स्ट्रेन आहे. इंग्लंडने हा नवा स्ट्रेनरुपी दुसर्‍या लाटेचा धोका ओळखून निर्बंध लागू केले. स्ट्रेनच्या प्रसाराची तीव्रता लक्षात घेता इंग्लंडला जाण्यायेणार्‍या विमानांवर बंदी घालण्यात आली. तसेच जाऊन आलेल्या प्रवाशांबाबत दक्षता घेण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना स्वतंत्रपणे उपचार देणे आणि विलगीकरण करणे याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. असे जे प्रवासी पुण्यात आढळून आलेले नाहीत अशा बेपत्ता लोकांचा शोध पोलिसांकडून युध्दपातळीवर घेण्यात येत आहे. कारण सर्व प्रवाश्यांपर्यंत पोहचता आले तर त्यांचा सामाजिक संपर्क खंडित करून नव्या स्ट्रेनच्या प्रसाराला रोखता येणार आहे. या स्ट्रेनची चाहूल ही धोक्याची पूर्वसूचना समजून यंत्रणा कामाला लागल्या, हे बरे झाले. अन्यथा आतापर्यंतचा कोरोनालढा व्यर्थ ठरला असता. म्हणूनच हूल उठली अन चाहूल लागली, हे आजचे कटू वास्तव आहे.

ब्रिटनहून आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह ठरलेल्या 21 रुग्णांचे नमुने जनुकीय रचनेच्या विश्लेषणासाठी (जिनोमिक सिक्वेन्सिंग) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर संसर्ग झालेला विषाणू हा मूळ की जनुकीय बदल झालेला अर्थात स्ट्रेन आहे किंवा कसे हे कळणे अपेक्षित आहे. त्यासाठी ब्रिटनहून आलेल्या सर्व प्रवाश्यांचा शोध आणि तपासणी आवश्यक झाली होती. राज्यातील एकूण 3 हजार 577 प्रवाश्यांचा पोलिस आणि आरोग्य खात्याने शोध घेऊन 1 हजार 980 प्रवाश्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातून 30 प्रवाश्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. त्यात मुंबईतील 12, नागपूर 4, ठाणे आणि पुणे प्रत्येकी 3, औरंगाबाद आणि बुलढाण्यातील प्रत्येकी 2 आणि नांदेड, नाशिक, रायगडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मागील सप्ताहापर्यंत देशात ब्रिटनहून परतलेल्या एकूण 233 प्रवाश्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर केंद्राने 10 अत्याधुनिक प्रादेशिक प्रयोगशाळांना जनुकीय रचना विश्लेषणाचे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. पॉझिटिव्ह केसेसपैकी 5 टक्के केसेस या प्रयोगशाळेकडे पाठवायचे केंद्राचे राज्यांना निर्देश आहेत.

लशीकरणाचा प्राधान्यक्रम निश्चित असल्याचे आपण जाणतो. आरोग्य खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला लस द्यावयाची आहे. राज्य शासनाने जवळपास सर्व जिल्ह्यातील एकूण 7.17 लाख आरोग्य खात्यातील लोकांची माहिती अपलोड केली आहे. याकरिता 4167 शासकीय आणि 28,849 खासगी सुविधांचा उपयोग करून घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ड्राय रन अर्थात सराव लसीकरण पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश या चार राज्यात पार पडले आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. या ड्राय रनचे अहवाल उपयोग इतर राज्यांना झाला आहे. राज्यात पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूर येथे लसीकरणाची रंगीत तालीम पार पाडली आहे. लसीव्दारे निर्माण होणार्‍या अँटीबॉडीज या स्ट्रेनविरुध्द संरक्षण करायला सक्षम आहे, असा शास्त्रज्ञ डॉ अर्णब घोष यांनी दिलासा दिला आहे. डॉ घोष हे पुणे शहरात करण्यात आलेल्या सेरोसर्वे शोध मोहिमेत सामील असलेले निष्णात संशोधक आहेत. संरचना बदलणारा कोरोना विषाणू अर्थात स्ट्रेनही धोकादायक असल्याने खबरदारी अजूनही गरजेची आहे असेही तज्ञांनी सांगितले आहे. एक विषाणू निर्गमनाची हूल उठवतो. दुसरा विषाणू, स्ट्रेन चाहूल देतो. हा चकवा आता उद्ध्वस्त करणे भाग आहे.

कोरोना हा संसर्गजन्य सूक्ष्मातीसूक्ष्म विषाणू आहे आणि त्याला सहज फैलावाचे वरदान लाभले आहे. मग आपण आपल्या निष्काळजीपणा आणि बेफिकिरीमुळे त्याला ग्रसित करून घ्यायचे की त्याच्या संसर्गाच्या साखळीचे चक्रव्यूह भेदायचे हे आपणच ठरवायचे आहे. न्युझीलंड या देशाने सुरुवातीला कोरोनाविरुद्धची लढाई आणि मुक्तीचा डांगोरा पिटण्यात घाई केली आणि नंतर त्यांना पुन्हा विषाणूग्रस्तता, लॉकडाऊन वगैरेला सामोरे जावे लागले. स्वीडन या देशाने सुध्दा हर्ड इम्युनिटीवर अवास्तव भर दिला आणि कोरोनामुक्तीचे स्वप्न पाहिले. पण तो प्रयोग फोल ठरला. आता तर कोरोनाची नवी आवृत्ती अवतरली आहे. जी 70 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. लहानग्यांना तर अधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या देशाने अवलंबलेले धोरण आणि विशाल लोकसंख्येने संयमाने दिलेली साथ वैशिष्टयपूर्ण ठरली आहे. सारे जग यापासून नक्की बोध घेईल. हर्ड इम्युनिटीवर अवलंबणे नाही की कोरोनामुक्तीची टिमकी नाही. शोध, विलगीकरण, उपचार आणि त्रिसूत्री पालन हे आपल्या कोरोना फैलाव नियंत्रणाचे गमक आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये; पण स्ट्रेनच्या चाहूलीमुळे सावध पाऊले टाकणे हिताचे आहे. संसर्ग न होणे अथवा लक्षणे उघड न होणे, हे कणखर रोगप्रतिकारशक्ती आणि प्रतिपिंड यामुळे शक्य आहे. पण सर्वांचे असे नाही, नसते.

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या अनेकांना सह्व्याधी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सह्व्याधीचे लोक संसर्गाला पोषक असतात. आणि संसर्ग झाला की सह्व्याधीमुळे शरीर कमजोर पडून कोरोना बस्तान बसवून प्रबळ होतो आणि रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. हे ध्यानात घेऊनच, ज्यांना लक्षणे दिसून आली नाहीत, त्यांनीही संसर्गग्रस्त नाही, असे न समजता, त्रिसूत्रीचे अखंड पालन करायला हवे. गर्दीत जाणे टाळायला हवे. जेणेकरून कोरोना प्रतिबंध साध्य होईल. लक्षणे न दिसलेल्या म्हणजेच असिम्पटोमॅटीक लोकांकडून संसर्ग होत नाही, असे प्रमाणित झालेले नाही. त्यामुळे संसर्ग झाला नाही किंवा सुरक्षित राहिलो, या भ्रमात न राहता अजाणतेपणे ज्येष्ठांना आणि लहानग्यांना संसर्ग होणार नाही, याची काळजी ठणठणित म्हणजेच रोगविरोधात सक्षमता धारण केलेल्या लोकांनी घ्यायला हवी. नवा स्ट्रेनपासून बालकांचे संरक्षणही करणेही महत्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही धोका न पत्करणे सर्वांच्या हिताचे आहे. आपण आधी ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’ असे सूत्र पाळले होते. आता स्ट्रेनची चाहूल आणि लसीकरण लक्षात घेऊन ‘दवाई भी और कडाई भी’ हे पुढचे सूत्र आपण पाळायला हवे. लस तर घ्यायची आणि त्रिसूत्रीचेही काटेकोर पालन करायचे. टाळेबंदी टाळून जनजीवन सुरक्षितपणे पुढे न्यायचे असेल तर हे पुढचे सूत्र अनिवार्य ठरते.

स्ट्रेन अर्थात नवा विषाणू हा ब्रिटनमधून बाहेर पडला होता. डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, कॅनडा, जपान, लेबनान, सिंगापूर इथे हा स्ट्रेन आता पोहचला आहे. भारतातही ब्रिटनहून परतलेल्यांपैकी 29 नवकोरोनाबाधित अर्थात स्ट्रेनसंसर्गग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान जूननंतर पहिल्यांदाच सरलेल्या या डिसेंबर महिन्यात देशात बाधितांचा आकडा 10 लाखापेक्षा कमी म्हणजे 8 लाख 24 हजार राहिला आहे. कोरोना उतरणीला लागत आहे. सोबत स्ट्रेनचे आव्हानही आहे. सरलेल्या वर्षाने राज्याने 19 लाख 30 हजार केसेस आणि 49 हजार 521 मृत्यू दाखवले आहेत. पुण्यात वर्षाखेरीला 6 हजार, 215 चालू केसेस होत्या. मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा 8 हजार 818 नोंदवला गेला आहे. देशात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा हा 1 लाख, 48 हजार, 475 आहे. 2021 मध्ये कोरोना संख्यांशास्त्र फार करावे लागणार नाही, अशी अपेक्षा आहे. स्ट्रेनची चाहूल लागली असली तरी लसचे संरक्षण आले आहे. स्ट्रेन हे विषाणूचे पहिलेच उत्क्रांत रूप नाही. संरचना बदलाची अपेक्षा असल्याने लस विकसित करताना ती काळजी घेण्यात येतेच;पण आता स्ट्रेननंतर युक्रेनमध्ये कोरोना विषाणूचे पाच प्रकार आढळून आले आहेत. त्याचीही दखल घ्यावी लागणार आहे.

हूल देणे हे कोरोना विषाणूचे लक्षण असले तरी नवा विषाणू चाहूल देणार नाही असा प्रतिबंध त्रिसूत्रीव्दारे शक्य आहे. बचावाचा तोच सर्वोत्तम मार्ग आहे. त्यानेच आतापर्यंत सावरले आहे. त्याला धरून राहिलो तर स्ट्रेनलाच हूल देणे आपल्याला शक्य होईल. पहिला विषाणू हूल देतो, दुसरा चाहूल देतो, पण संरक्षणाची ढाल आपल्याकडे आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. ‘दवाई भी, कडाई भी’ हा मूलमंत्र सन 2021 मध्ये जोपासणे सर्वांच्या हिताचे आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा