मुख्यमंत्र्यांची भावना

भंडारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भंडार्‍यातील रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 चिमुरड्या बालकांचा मृत्यू झाला. त्या बालकांच्या कुटुंबांचे मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केले. यावेळी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबांसमोर मी हात जोडून उभा होतो, अशा शब्दांत या सुन्न करणार्‍या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भंडार्‍यातील या घटनेची चौकशी करण्यात येईल. कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही; पण दुर्लक्ष करणार्‍यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव यांनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर सांगितले. तसेच, राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

ते म्हणाले, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या पालकांना भेटलो. त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. कारण जीव गेले आहेत. कितीही सांत्वन केले तरीही ते परत आणता येणार नाहीत. दुर्घटनेनंतर जे होते, ते आधी का होत नाही, असा प्रश्न आता विचारला आहे. कोरोना संकट असल्याने इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आहे का, याचीही चौकशी केली जाईल. हा प्रकार अचानक घडला की वारंवार तक्रारी येत असतानाही अनास्थेमुळे घडला, त्याचीही चौकशी होईल.

तर त्या बालकांचा जीव वाचला असता

नागपूर : निष्काळजीपणामुळे 10 बालकांना जग पाहण्यापूर्वीच प्राण सोडावे लागले, यापेक्षा वेदनादायी आणखी काय असावे?,’ अशी भावुक प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी रविवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. ते म्हणाले, ’रुग्णालयात फायर सेफ्टीची कुठलीही व्यवस्था नाही. यासाठीचा प्रस्ताव मे महिन्यात आरोग्य सेवा सहसंचालक आणि पुढे मंत्रालयापर्यंत पोहोचला. त्यावर वेळीच निर्णय झाला असता, तर आज या बालकांचे प्राण वाचले असते, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा