तीव्र विरोधानंतर खट्टर यांचा शेतकरी महापंचायत कार्यक्रम रद्द
कर्नाल : शेतकर्यांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना ‘शेतकरी महापंचायत’ अखेर रद्द करावी लागली आहे. नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवित रविवारी शेकडो शेतकर्यांनी मुख्यमंत्री खट्टर यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त शेतकर्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तसेच, थंड पाण्याचा मारा व अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून शेतकर्यांना पांगविण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.
नवीन कृषी कायद्यांचे फायदे समजावून सांगण्याकरिता कर्नाल जिल्ह्यातील कैमला गावात काल भाजपने शेतकरी महापंचायत हा कार्यक्रम आयोजित केला होता. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर शेतकर्यांना नवीन कृषी कायद्याचे फायदे समजावून सांगण्यासाठी येणार होते. मात्र आंदोलनकर्त्या शेतकर्यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवित आंदोलन केले. शेतकर्यांनी खट्टर यांचे हेलिकॉफ्टर उतरण्याची जागा (हेलिपॅड) उद्ध्वस्त केली. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले पोलिस आणि स्थानिक पोलिस आणि शेतकर्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. शेतकर्यांनी आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे पोलिसांनी लाठीमार करण्याचे आदेश दिले.
यावेळी पोलिसांनी भाजप नेत्यांना सुरक्षाकडे करून सुरक्षित ठिकाणी हलविले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात शेकडो शेतकरी शेतात धावताना दिसत आहेत. पोलिस शेतकर्यांवर लाठीमार करत आहेत. आंदोलन करणार्या शेतकर्यांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारेही मारण्यात आले. घटनेनंतर शेतकरी आजूबाजूच्या गावांमध्ये गेले आहेत. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री खट्टर यांचा शेतकर्यांंसोबतचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, पंजाब, हरियाणातील लाखो शेतकरी दिल्लीमध्ये गेल्या दीड महिन्यापासून नव्या कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करत आहेत. याआधी हरियाणातील खट्टर सरकारने पंजाबच्या शेतकर्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्यासाठी बळाचा प्रयोग केला होता. काही दिवसांपर्यंत शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष उडाला होता. पोलिसांनी रस्त्यात आडवे लावलेले बॅरिकेट तोडल्याने पोलिसांनी शेतकर्यांवर अश्रुधूर आणि पाण्याचा मारा केला होता.
ढोंग बंद करा…
शेतकर्यांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेवरून काँग्रेसने मुख्यमंत्री खट्टर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. खट्टर सरकार किसान महापंचायतीचे ढोंग करत आहे, त्यांनी हे ढोंग तात्काळ बंद करावे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदिपसिंह सुरजेवाला यांनी केली. मनोहर लाल खट्टर यांनी किसान महापंचायतीचे ढोंग बंद करावे आणि अन्नदातांच्या भावना व संवेदनांशी खेळून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कट थांबवावा. गेल्या 46 दिवसांपासून सीमेवर आंदोलन करणार्या शेतकर्यांशी संवाद करा, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.