सत्तेत असणारेच जर हिंसाचाराला उत्तेजन देत असतील तर काय घडते हे अलिकडच्या काळात भारताने पाहिले आहे. पराभव मान्य न करण्याच्या ट्रम्प यांच्या हट्टातून अमेरिकेत संसदेवर हल्ला झाला आहे.

अमेरिकेच्या राजधानीत परवा जे घडले त्यामुळे केवळ त्या देशाची नव्हे, तर लोकशाही मानणार्‍या सर्वांची मान शरमेने खाली गेली. वॉशिंग्टन मधील ‘कॅपिटॉल हिल’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या भागात ‘कॅपिटॉल’ ही अमेरिकेच्या संसदेची इमारत आहे, तेथेच त्या देशाचे सर्वोच्च न्यायालय आहे. याच ‘कॅपिटॉल’मध्ये एक अनावर जमाव घुसला, त्याने सिनेटच्या सभागृहाचा काही काळ ताबा घेतला, तोडफोड केली. हा जमाव मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांचा होता. ट्रम्प हेच अध्यक्षपदी राहावेत अशी या बेधुंद जमावाची मागणी होती. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार सिनेटमध्ये दोन्ही उमेदवारांच्या ‘इलेक्टोरल कॉलेज’च्या मतांची मोजणी सुरु असताना हा जमाव घुसला. त्यामुळे मतमोजणी थांबवावी लागली, सिनेटच्या सदस्यांना, अन्य कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेऊन बाहेर पळावे लागले. सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्याही कार्यालयाची नासधूस करण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी कारवाई केल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली; पण तो पर्यंत चार जणांना हकनाक मृत्युमुखी पडावे लागले होते. जेथे सुरक्षा व्यवस्था कडक असते तेथे, मतमोजणीच्या वेळीच हा जमाव मुळात जमला कसा? संसदेत घुसून तोडफोड करण्याचे धाडस त्याला मिळाले कोठून? तो एवढा बेफाम का व कसा झाला? हे प्रश्न अमेरिकेला अनेक वर्षे सतावतील.

ट्रम्प यांची चिथावणी?

या जमावाला खुद्द ट्रम्प यांनीच चिथावणी दिली असे आरोप उघडपणे होत आहेत. त्यांनी ते नाकारलेले नाहीत. ट्रम्प अजूनही अध्यक्षपदी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी जोर धरत आहे. ती किचकट प्रक्रिया असल्याने तसे घडेल की नाही, निवृत्तीनंतर त्यांच्यावर खटला चालवला जाईल का, हे प्रश्न शिल्लक आहेत. मात्र या घटनेने सत्तेच्या मुजोरीचे दर्शन नक्कीच जगाला घडले. यंदाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अमेरिकेत विक्रमी मतदान झाले. ही निवडणूक गेल्या 3 नोव्हेंबर रोजी पार पडली. त्याचे निकाल प्रसिद्ध होऊ लागले तेव्हापासून ट्रम्प मागे पडल्याचे व डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन विजयी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते; पण ट्रम्प यांना हा निकालच मान्य नव्हता. ही निवडणूक ‘चोरली गेली’ आहे असा दावा करत फेरमतमोजणीची मागणी केली, अनेक राज्यांच्या न्यायालयात धाव घेतली. बायडेन मोठ्या फरकाने विजयी झाल्याचे स्पष्ट झाले तरीही ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला नाही. त्यांचे म्हणणे खरे असल्याचे मानणारा वर्गही मोठा आहे. हा वर्ग प्रामुख्याने गौरवर्णीय आहे व गौरवर्णीयांची सत्ता असावी असे मानणारा आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर सतत टीका करत ट्रम्प यांनी हा ‘बहुसंख्याकवाद’ काळजीपूर्वक जोपासला. त्याच आधारे पुन्हा सत्तेवर येण्याचे त्यांचे मनसुबे होते. मात्र कृष्णवर्णीय नागरिकांच्या श्वेतवर्णीय पोलिसांनी अकारण केलेल्या हत्यांमुळे जनमत फिरले. त्यातच कोरोनाच्या साथीने अर्थव्यवस्था कोसळली. या साथीवर त्यामुळेच ट्रम्प नाराज होते. ट्रम्प यांची वृत्ती व कार्यशैली हुकूमशाही पद्धतीची आहे हे आता सिद्ध झाले आहे. बायडेन यांच्या विजयाला रशियाचे अध्यक्ष पुतिन, चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांनी लवकर मान्यता दिली नव्हती हे लक्षणीय आहे. कारण हे दोघेही हुकूमशहाच आहेत. सिनेटने परवा निकाल जाहीर केला तेव्हा प्रथमच ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला; पण त्यांना तो मान्य आहे असे नाही. त्यांनी बायडेन यांचे ना अभिनंदन केले ना त्यांना शुभेच्छा दिल्या. हिंसाचार घडवणार्‍यांना कठोर शिक्षा केली जाईल या त्यांच्या इशार्‍याला कोण गांभीर्याने घेईल? असे उदाहरण भारतातही दिसले आहे. बाबरी मशीद पाडली गेली; पण करसेवकांना चिथावणी देणारे सापडले नाहीत. गो मांसाच्या वाहतुकीच्या संशयावरून अनेकांना मारहाण झाली, काहींचे खून झाले पण हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही. अल्पसंख्याकांवर हल्ले करण्याचे इशारे देणारे कारवाईची भाषा करत असतील तर हल्लेखोर का घाबरतील? ट्रम्प यांच्या अफाट सत्तालोभातून अमेरिकेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना घडली; खरे तर झुंडशाहीला प्रोत्साहन देत ती घडवली गेली!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा