पुणे : ज्येष्ठ गायक व पुणे भारत गायन समाजाचे कार्याध्यक्ष सुधीर तथा माधव अनंत दातार यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी प्रसिद्ध गायिका शैला दातार, मुलगी गायिका शिल्पा पुणतांबेकर, मुलगा तबलावादक हृषीकेश दातार आणि नातवंडे असा परिवार आहे. पुणे भारत गायन समाजाचे संस्थापक देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे ते नातू होत.
मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली. दातार यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संगीत क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दातार यांना ज्येष्ठ गायक पं. राम मराठे यांच्याकडून अनेक वर्षे अभिजात संगीताची तालीम मिळाली होती. पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. गजाननबुवा जोशी आणि स्वरराज छोटा गंधर्व अशा दिग्गज कलाकारांचा त्यांना अनेक वर्षे सहवास लाभला. पुणे भारत गायन समाजाचे कार्याध्यक्ष या नात्याने त्यांनी भास्करबुवा यांच्या संगीत वास्तूची मनोभावे सेवा केली. स्वरानंद संस्थेच्या ‘आपली आवड’ आणि ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील सदाशिवच्या भूमिकेसाठी त्यांना सुवर्णपद मिळाले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा