आत्मचिंतन : विद्यावाचस्पती विद्यानंद

व्यक्ती म्हणून कितीही स्वतंत्र अस्तित्व असले तरीही शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक पातळीवर कोणतीही व्यक्ती एकट्याने जीवन आनंदी करू शकतेच असे नाही. प्रत्येकाला कोणाची का होईना पण साथ, सोबत, संगत हवी असतेच. शरीराने जसे फार काळ कोणी एकटे राहू शकत नाही, तसेच मनाने देखील एकलेपण अधिक काळ सुखावह ठरत नाही.

आपल्याला आयुष्य जगण्यासाठी सद्य:स्थितीत पैसाच लागतो, पण जीवन आजमावण्यासाठी कोणाचीतरी साथ, सोबत, संगत लागत असते. तुझे माझे जमेना, पण तुझ्याविना करमेना, अशी स्थिती असली, तरीही अनेकदा ते मान्य होते. प्रत्येकाला सहजीवनाची गरज भासतेच. कदाचित, प्रत्येकाची तशी मानसिकता आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांवर होत असते. प्रत्येकाच्या मानसिक पातळींवर होत असलेल्या निरनिराळ्या स्थित्यंतरांवर ही गरज कमी-अधिक होत असते. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अथवा शारीरिकदृष्ट्या जरी एकटे आयुष्य जगणे एखाद्याने पसंत केले अथवा स्वीकारले, तरीही त्याला मानसिकदृष्ट्या काहीवेळा, काही बाबतीत जाणवणारा एकलेपणा मात्र आंतरिक अस्वस्थता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो, मानसिक ताण-तणावाचा अनाकलनीय दबाव उत्पन्न होत राहतो. प्रत्येक व्यक्तीला सहजीवनाची गरज, ही मानसिक पातळीवर अधिक आवश्यक असते. सहजीवनाच्या प्रवासाचा तेव्हाच प्रयास वाटत नाही, जेव्हा सकारात्मक दृष्टीकोनातून तो केला जात असतो. आपल्या सुख-दु:खांत, आयुष्यातील चढ-उतरांत सह-प्रवासी देखील आपली साथ-सोबत करणारा असणे योग्य ठरते. ती साथ-सोबत देखील जीवन के साथ भी; जीवन के बाद भी, अशीच असणे अभिप्रेत असते. सकारात्मक सहजीवन जगता येणे ही केवळ कला नसून ते एक शास्त्र आहे. ह्या शास्त्रात संवाद, सहवास, सहभाग, सहकार आणि सम-भोग या बाबींचा कृतीशील विचार करावा लागतो, त्यांचा अंगीकार करणे आवश्यक ठरते. सहजीवन सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी साथ-सोबत करणार्‍या प्रत्येकाने कर्तव्यापोटी स्वीकारलेली जबाबदारी समसमान घेतलेली असणे अभिप्रेत आणि अपेक्षित असते.

संवाद ह्या शब्दातील तीनही अक्षरे एकमेकांना आहेत त्याच क्रमात फेविकॉल लावून चिकटवून ठेवायची असतात. त्यांचा क्रम जरी बदलला अथवा संवाद ह्या शब्दातील पहिलेच अक्षर गळून पडले, तर शिल्लक राहतो फक्त वाद. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंबपद्धतीत आपापसांत संवाद साधायला तेवढा गोतावळा नाही. काही काळापर्यंत हम दो: हमारे दो चा जमाना होता, कालांतराने घर तिघांचे झाले. कदाचित लिव्ह इन रिलेशन संस्कृतीचे वेड पांघरलेल्या व्यक्ती तर, आपत्य ही आपत्ती असल्याची प्रतिक्रिया देतात. त्यांतच समाज माध्यमांचा (सोशल मिडियाचा) अनेकांवर असलेला पगडा आणि एकूणच व्हर्च्युअल संवादाची निर्माण झालेली ओढ, ह्यांमुळे परस्परांतील संवादाचे स्वरूप बदलल्याचे स्पष्ट चित्र आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे. संवादाच्या अभावामुळे परस्परांवरील प्रभाव कमी होत चाललाय. संवादाच्या अभावामुळेच एकमेकांचे स्वभाव समजत नाहीत. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्त होणे हे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते.

काहीतरी बोला, असे म्हंटले तर काही जणांच्या प्रतिक्रिया अशा असतात की, काय बोलू…..?. आपले व्यक्त होणे हे नेहमी शाब्दिकच हवे असे काही नाही, आपल्या देहबोलीतून देखील आपापसातील संवाद चांगला होऊ शकतो. काहीवेळा, मूकसंवाद देखील खूप काही सांगून जातात. त्यासाठी आभासाची नाही तर अभ्यासाची जरुरी असते. संवादात अनेकदा त्याचीच उणिव भासते. संवादाची उणिव असल्याची जाणीव झाली नाही तर केवळ परस्परांमध्ये दूरीच नाही, तर दरी निर्माण होऊ लागते. मग, मला असे वाटले, मी असे म्हंटलेच नव्हते, माझ्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो, मी बोललेले कळतच नाही, मला बोलायची इच्छाच नाही अशा स्वरूपातील काही प्रतिक्रिया आपल्याला अनकेदा ऐकू येत असतात. संवाद साधण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असते. सहजीवनातील प्रत्येक समस्येवरचा उत्तम इलाज म्हणजे संवाद. त्याला सु हे विशेषण लावून सुसंवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात करणारा नेहमीच यशोशिखरे गाठू शकतो. संवादात समाधान मिळत असते, तर सहवासांत सुख मिळते. दहा शब्दांच्या मेसेज पेक्षा दोन शब्दांमध्ये बोलणे चांगले वाटते. त्याहीपेक्षा, शब्दविरहीत सहवास अधिक भावतो, हवाहवासा वाटतो. काहीवेळा ह्या सहवासांत स्पर्शाचा अभाव असला तरीही सुखद अनुभवांची प्रचीती येत असते. सहजीवानांत सहवास अधिक गरजेचा आणि म्हणूनच आवश्यक असतो. सहवासाने शारीरिक एकटेपणा आणि मानसिक एकलेपणा संपुष्टात येण्यास मदत होत असते. सहजीवनातील सहवासांत स्पर्शाची आश्वस्त करणारी सकारात्मक उर्जा, ताकद सामावलेली असते. ह्या आश्वस्त करणार्‍या शक्तीमुळे मानसिक एकलेपणातील अस्वस्थता दूर जात असते. सहवासांत एक निराळे नाते निर्माण होत असते. सहजीवनातील सहवासांत परस्परांमध्ये एक ओढ निर्माण होत असते.

आपले म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचा अथवा गोष्टीचा मनापासून स्वीकार करतो तेव्हाच त्यांमधील आपला सहभाग वाढत जातो. तुझे-माझे करण्याच्या विचारांमुळे असणारा सहभाग केवळ माझ्या स्वत:शी संबंधित गोष्टींशीच राहतो. आपण सहजीवनाचा एकदा स्वीकार केला तरीही, का बरे करतो असे? अनेकदा घडणार्‍या काही घटना, घडामोडी ह्या निसर्गनियमांमुळे सुरु असल्यासारखे वाटते. कदाचित सहभागाचा अभाव असल्याचे ते महत्वाचे कारण असावे. सहभागाचा आनंद हा केवळ त्याची प्रचीती आल्याशिवाय मिळत असतो. आपल्या भागाचे, वाट्याचे, नावचे, कर्तव्याचे भान ठेवून सहजीवनात सहभागी होणे महत्वाचे असते. आनंदप्राप्तीसाठी सकारात्मक वातारणाची निर्मिती करत राहणे गरजेचे असते.

सहजीवानांत सहकाराच्या, सहकार्‍याच्या आणि सहकार्याच्या भावनाप्रधान विचाराने, मदतीने सकारात्मक वातावरणाची निर्मिती होत असते. एकमेकांच्या जीवनांत अनावधानाने निर्माण झालेल्या असहकाराच्या विचार, वर्तन आणि व्यवहाराने निर्माण होणारी नकारात्मकता अनेकदा नैराश्यास कारणीभूत ठरत असते. मी आणि माझे ह्या भावविश्वात अडकलेल्या व्यक्ती सहजीवानांत सकारात्मकता आणू शकतातच असे नाही. स्वतःपेक्षा दुसर्‍याचा, इतरांचा विचार करणारी व्यक्ती नकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत नाही. अनेकदा मला खूप काही करायचे असते, पण सहकार्यच मिळत नाही, असे सूर अनेकांच्या तोंडून निघत असतात. सहजीवानांत समजून सांगण्याची नाही, तर समजून घेण्याचीच गरज अधिक असते. केवळ आपल्यालाच सगळे कळते, ह्या भ्रमांत सहकाराची भूमिका कधीच बजावली जात नसते.

सहजीवनांत केवळ संभोगच नाही तर, सम-भोगही महत्वाचा ठरतो. प्रत्येकाच्या प्रारब्धातील भोग सहजीवानांत सम-समान असले, तर पुढील जीवनांत येणारे योग देखील समसमान अनुभवायला मिळू शकतात. सुख के सब साथी; दुख में ना कोई, अर्थात सुखाचा आनंद प्रत्येकाला हवा असतो, पण दु:खात सम-भोग घ्यायची मानसिकता नसते, दुसर्‍याचे दु:ख भोगण्याची, वाटून घेण्याची, त्यांत सहभागी होण्याची तयारी नसते. सहजीवनांत सुख, दु:ख ह्या प्रत्येक प्राप्त परिस्थितीचा आनंदाने, सामूहिकरीत्या स्वीकार करावा लागत असतो. सहजीवनात तुझे-माझे करून चालत नाही, तिथे नेहमीच आपलेपणाची भावना असावी लागते. जीवनातल्या भोगापेक्षा सहजीवनातला योग मोठा, महत्वाचा असतो. हल्लीच्या व्हर्च्युअल जमान्यात संवाद, सहवास दोन्हीही इतिहासजमा होत चालले आहे. संवाद होतो म्हणा तसा, पण व्हर्च्युअल पद्धतीने, प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवर बोलूनही नाही, तर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे. त्यामुळे सहवासाचा तर प्रश्नच येत नाही. दिवसेंदिवस निर्माण होत जात असलेल्या ह्या दुराव्याला रक्ताच्या नात्याचा ओलावा राहण्याची शक्यता कमी होत असल्याचे जाणवते. अशावेळी बादरायण संबंधांचा तर विषयही मनाला स्पर्श करण्याचे कारण नाही. ह्या व्हर्च्युअल जमान्याने पती-पत्नीचे नाते संपवायचे काम केले आहे का? एक काळ असा होता, जिथे नव्याने नाती निर्माण केली जायची. काही वेळा तर ती रक्तापलीकडची असून सुद्धा अधिक घट्ट असायची. अलीकडील काही दिवसांत अगदी मोजक्याच नात्याचे कुटुंब आपल्याच भावविश्वात रममाण झालेले दिसून येते. अर्थात याला बदलत चाललेली जीवनशैली, मानसिकता कि व्हर्च्युअल जगाची उत्पत्ती कारणीभूत आहे? हाच कळीचा मुद्दा आहे.

भोगवादी संस्कृतीचे अनुकरण न करता आपल्या सकारात्मक सहजीवनासाठी एक आदर्श व्यक्तीमत्वांच्या यादीत आपण येण्यास समर्थ आहोत, ह्या जाणीवेतून आवश्यक ते बदल मी माझ्यापासूनच करणार आणि ते देखील मी एक कर्तव्यदक्ष, सुज्ञ, सुजाण, सजग मनुष्यप्राणी आहे म्हणून, असा निर्धार केला आणि तशी कार्यकृती करायला सुरुवात केली कि, सुख, समाधान, शांती ह्या तिन्हींची अनुभूती येणारच आणि लग्न निश्चितच मग्न करणारे ठरणार. त्यासाठी चित्त, वित्त आणि पित्त ह्यांचा समतोल राखणार्‍या विवाहाची आवश्यकता आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा