भंडारा : शनिवारची पहाट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली.ही घटना शनिवारी रात्री अचानक घडली. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आले. नर्सने दार उघडून बघितले असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. नर्सने त्वरित ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.

माहिती मिळताच अग्रिशामक दलाने रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या सात बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊट बॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

या दूर्दैवी घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आरडाओरडा सुरू झाला. मयत बालकांच्या कुटुंबांनी हंबरडा फोडला. तर रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठकही झाली.

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी सकाळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. माहिती घेण्याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेत आरोग्य राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!”, अशी मागणी त्यांनी ठाकरे सरकारकडे केली.

ही दु्र्दैवी घटना भंडाऱ्यातील जिल्हा रूग्णालयात घडली. मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. तसेच, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने ७ बालकांना वाचविण्यात यश आले. पण या दुर्घटनेमुळे १० बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला”, अशी अधिकृत माहिती टोपे यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा