सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापुरातील ‘एमआयएम’च्या गढीला खिंडार पाडल्यानंतर आता सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेलाच धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने सोलापूर महापालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख महेश कोठे यांनाच गळाला लावल्याची चर्चा आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आता सोलापुरातही अहमदनगरच्या ‘पारनेर पॅटर्न’ची पुनरावृत्ती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी तीव्र नापसंती दर्शविल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नगरसेवकांना घरवापसीचा सल्ला दिला होता. मात्र, सोलापुरात महेश कोठे बर्‍याच दिवसांपासून नाराज असल्याने तडजोड होण्याची शक्यता कमी आहे. महेश कोठे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग केला आहे. हे पद त्यांनी आपले विश्वासू सहकारी नगरसेवक अमोल शिंदे यांच्याकडे सोपवले आहे.

विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग केल्यानंतर कोठे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याचे समजते. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेत असल्याचे कार्यकर्त्यांना बैठक घेऊन सांगितले. त्यामुळे सोलापुरात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. कोठे यांच्यासोबत आणखी काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास ती शिवसेनेसाठी मोठी नामुष्की ठरेल. सध्या सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचे अवघे चार नगरसेवक आहेत. मात्र, तौफिक शेख आणि महेश कोठे यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात राष्ट्रवादीची ताकद प्रचंड वाढेल, अशी चर्चा आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गळती लागलेल्या राष्ट्रवादीत नित्यनियमाने प्रवेश सुरु आहे. यामध्ये आता सोलापूरमधील एमआयएम पक्षाचे नेते तौफिक शेख यांची भार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून तौफिक शेख राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. तौफिक शेख यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट घेतली. आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची वेळ घेऊन सहा नगरसेवकांसह सोलापूरमध्येच कार्यक्रम घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा