पुणे : ज्येष्ठ लेखक, शिक्षणतज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. रात्रीच त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शेजवलकर वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बँक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुशाफिरी करत असत. त्यांनी विद्यापीठीय स्तरावर सुमारे 60 वर्षे अध्यापन केले आहे. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 82 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद त्यांनी अखंडपणे भूषविले. पुणे विद्यापीठाच्या ’नॉलेज मॅनेजमेंट’ या अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालकही होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद भूषविले आहे.
मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी डॉ. शेजवलकर नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करत असत. पुण्यात बी.कॉम.चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो, उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते. हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमधूनच साध्य झाले आहे. वाणिज्य विद्याशाखेत पीएच.डी.चा प्रबंध मराठीतून लिहिण्यास परवानगी मिळावी, हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला. सुमारे 30 पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली. प्रमोद जोगदेव यांच्या ’सकारात्मक विचारासाठी’ या पुस्तकाला प्र.चिं. शेजवलकर यांची प्रस्तावना होती. त्यांनी चार हजारांहून अधिक भाषणे मराठीतून केली. कामगारांसाठी ज्ञानशिक्षण देण्याचे वर्ग काढले. सुमारे 50 वर्षे त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा