पुणे : सलग दुसर्‍या दिवशी शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी दुपारी व रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मध्यवस्तीतील बहुतांश रस्ते जलमय झाले, तर काही रस्त्यांना अक्षरश: नाल्याचे स्वरूप आले. पावसामुळे मंदावलेल्या वाहनांच्या वेगामुळे महत्त्वाचे रस्ते आणि चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे दिवसभराची कामे उरकून घराकडे निघालेल्या नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
शहर आणि परिसरात काल सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आल्याने पावसाळी वातावरण तयार झाले होते. दुपारी शहर आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली, तर वाहनचालकांची गैरसोय झाली. रस्त्यांवर थांबून विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची विक्री करणार्‍यांना साहित्याची आवराआवर करताना तारेवरची कसरत करावी लागली. तसेच, चौकाचौकांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना मेहनत घ्यावी लागली. पावसामुळे काही चौकांतील सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. शहरात काल सायंकाळपर्यंत 24 मि.मी., तर लोहगाव येथे 25 मि.मी. पावसाची नोंद झाली.
पावसामुळे छोट्या रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. काही रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी वाहत होते. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही बराच वेळ रस्त्यावरून पाणी वाहणे सुरूच होते. त्यामुळे दुपारी झालेली वाहतूक कोंडी सायंकाळपर्यंत कायम होती. इतर वेळी ग्राहकांच्या गर्दीने गजबजणार्‍या विविध प्रकारच्या बाजारपेठेत पावसामुळे तुरळक प्रमाणात ग्राहक होते. ढगाळ वातावरण कायम असल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा