जीवन अध्यात्म : डॉ. जगन्नाथ श्यामराव पाटील

तीर्थयात्रा करणे हे पर्यटन मुळीच नाही. प्रत्येक तीर्थक्षेत्रांचे एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. ठिकठिकाणी यात्रा करून आलेले बरेच लोक माझं सगळं झालंय असे म्हणतात. काशी, गया, प्रयाग, चारधाम, अष्टविनायक सगळं-सगळं झालं. मग रहाते काय ? यात्रा होते. तीर्थ प्रसाद रहातो. हजारो कि.मी. प्रवास करायचा, शेकडो तास घालवायचे, उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घ्यावयाचा. वेगवेगळी खरेदी करायची. रहाण्याचे उत्तम ठिकाण पाहून रहावयाचे. जिथे जाईल तिथून आपल्या उद्योगाचे, नौकरीचे काम करायचे. मंदिरात जाऊन डोके टेकवले की यात्रा संपली. अशी तीर्थयात्रा कधीच नसते. मन ईश्वराच्या स्मरणात ठेवून सर्व कामे, विचार सोडून देऊन काही काळ तरी फक्त ईश्वरचिंतनासाठी वेळ द्यावा लागतो. त्यासाठी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन त्या क्षेत्राचा महिमा समजून घ्यावा. विविध रुपामध्ये दर्शन घ्यावे. शक्य ते आपापल्या ऐपतीप्रमाणे गरजुंना दानधर्म करावा, पुजा, सत्संग, नामस्मरण करावे आणि काही काळ तरी स्वत:ला विसरावे.

प्रत्येक तीर्थक्षेत्र हे कमी-अधिक प्रमाणात ऊर्जास्त्रोत आहे. नामस्मरण, पारायण, यज्ञयागादी कार्ये, जप, तप, योग, ध्यान धारणा, पुजा, आरती, अन्नदान, दानधर्म अशी अनंत प्रकारची साधना त्या तीर्थक्षेत्री होत असते. एकत्रित अशी ऊर्जा निर्माण झालेले ते ठिकाण बनते. त्या ऊर्जेचा फायदा तिथे जाणार्‍या यात्रेकरुंना होतो. तो फायदा घेण्यासाठी तरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काही दिवस रहावे लागते. तीर्थक्षेत्री जाऊन फक्त माथा टेकवण आणि नंतर पर्यटन करणे ही तीर्थयात्रा होऊच शकत नाही. पुराणातील कथा ऐकल्या तर आपल्याला असे लक्षात येईल की देवादिकांनाही, ऋषी, मुनी, साधु-संत यांनाही तीर्थाटनाचा मोह आवरला नाही. त्यांनीही तीर्थयात्रा करून आपली शक्ती, भक्ती वाढवली आहे. कलियुगात भक्तीला फार महत्त्व आहे. अनन्यभावाने भक्ती करावी आणि त्याच भावनेने तीर्थक्षेत्री जाऊन त्या क्षेत्रातील परंपरेप्रमाणे यात्रा करावी आणि आपली साधना वाढवावी. आध्यात्मिक शक्ती संपादन करावी. तीर्थयात्रा ही आपली निव्वळ वैयक्तीक साधना आहे. तीर्थयात्रा ही एक शुद्ध आध्यात्मिक साधना आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा