नसरापूर, (वार्ताहर) : गावच्या हद्दीत महामार्गावर अपघातात आत्तापर्यंत गावातील 21 बळी गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी पोलीस चौकीत मध्यरात्रीपर्यत ठिय्या मांडला. गुरुवारी संतप्त ग्रामस्थांनी गावात आलेल्या रिलायन्सच्या अधिकार्‍यांना नुकसानभरपाई आणि भुयारी मार्गाचे काम सुरु होत नाही तोपर्यंत त्यांना गावात डांबून ठेवण्याचा पवित्रा घेतला. अखेर सेवा रस्त्याचे काम सुरु करून नुकसानभरपाई देण्याची ग्वाही रिलायन्सने दिली. या अपघातप्रकरणी महामार्ग प्राधिकरण संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी ग्रामस्थांना सांगितले.

किसन ज्ञानबा बदक (वय 65 रा. हरिश्चंद्री ता. भोर) असे अपघातात ठार झालेल्या पादचारी ग्रामस्थांचे नाव असून हि घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे – सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री फाट्यावर घडली आहे. भुयारी मार्ग नसल्याने आतापर्यत गावातील 21 बळी आहे. भुयारी मार्ग आणि सेवा रस्ता नसल्याने हरिश्च्ंद्री गावाकडे सातारा पुणे बाजूवरील ओढ्याच्या पुलावरुन येताना पाठीमागून सातार्‍याकडून येणार्‍या जीपने बदक यांना जोरदार धडक दिली. उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

ग्रामस्थांनी यास जबाबदार धरून महामार्ग प्राधिकरण संचालक व चालक मनोज भोकरे रा. तळेगाव दाभाडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल रिलायन्सचे बांधकाम अभियंता राकेश कोळी यांना ग्रामस्थांनी डांबून रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण होते. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी या अपघातप्रकरणी चालकासह महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देत तातडीने रिलायन्स आणि ठेकेदारांना सेवा रस्त्याचे काम करण्याची सूचना केली. यानंतर रिलायन्सने पुणे बाजूकडील सेवा रस्त्याचे काम सुरु करण्यात आले असून मयताच्या कुटुंबाना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे मान्य केल्याने वातावरण निवळले

यावेळी ग्रामस्थांच्यावतीने राम पाचकाळे, मैत्री प्रतिष्ठानचे चंदुभैय्या परदेशी, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष संतोष मोहीते यांनी अधिकार्‍याबरोबर चर्चा केली. अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांच्या बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

रिलायन्सचे अधिकारी बेफिकीर

भुयारी मार्गासाठी हरिश्चंद्री ग्रामस्थांनी 14 डिसेंबर आंदोलन केले होते. यावेळी एनएचआय आणि रिलायन्सने सेवा रस्त्याचे काम सुरु करण्याचे लेखी पत्र दिले होते. रिलायन्सचे राकेश कोळी यांनी काम सुरु करण्याबाबत कळविले नसल्याचे यावेळी काम करणार्‍या ठेकेदारांनी सागितले. या बेफिकीरमुळे अपघात घडत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा