कणकवली : “सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे व ते म्हणत आहेत की हे कायदे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत, म्हणजे सहा महिने काय ते झोपा काढत होते का? एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे.” असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर आज टीका केली.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते खासदार नारायण राणे, आमदार रविंद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली काढली होती. या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतर जाग आल्यानंतर एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर जर देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले नाही आणि त्यांनी हे काय नाटक सुरू आहे? आमचा कृषी कायद्याला पाठिंबा आहे असे म्हटले नाही तर त्यांचे (विरोधकांचे) खरे होईल.”

तसेच, “महाराष्ट्रात या कायद्याला विरोध नाही. मग आपण रस्त्यावर का यायचं? तर, ते(विरोधक) रस्त्यावर येऊन थेट कॅनडापासून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्यावर अन्याय होत आहे. म्हणून आपल्याला हे कायदे आमच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे आमचे आयुष्य समृद्ध होणार आहे हे जगाला सांगावे लागणार आहे. मूठभर शेतकरी दिल्लीत बसले आहेत. तिथं काय-काय सुरू आहे हे आपल्याला माध्यमांद्वारे दिसत आहे. त्याला उत्तर म्हणून हे दाखवण्याची आवश्यकता आहे की संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी आहे. संपूर्ण देश या कायदयाच्या बाजूने आहे. संपूर्ण देश या कायद्याचे समर्थन करतो आहे. हे दाखवण्याचा एक भाग ते दाखवण्याचे एक माध्यम ही आजची ट्रॅक्टर रॅली आहे, शेतकऱ्यांची रॅली आहे. ज्यामध्ये आपण काही मागण्या करत नाहीत. तर, शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी भाजप मैदानात असा संदेश देत आहोत.” असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा