पुणे : 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला की दिल्लीला अशी चर्चा चार दिवसांपासून रंगली होती. मात्र आगामी संमेलनाचा मान नाशिकला मिळाला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक औरंगाबाद येथे होणार आहे. या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील संमेलन स्थळाची अधिकृत घोषणा करणार आहेत. घोषणेनंतर संमेलन स्थळाच्या चर्चेवर पडदा पडणार आहे.
डॉ. दादा गोरे, प्रकाश पायगुडे, प्रतिभा सराफ, रामचंद्र काळुंखे यांच्या संमेलन स्थळ निवड समितीने गुरूवारी नाशिकच्या लोकहितवादी संस्थेला भेट दिली. या भेटीत संस्थेची पाहणी, संस्थेची आयोजनाची क्षमता आणि संमेलनासाठी नियोजित जागेची पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर स्थळ निवड समितीतील सर्व सदस्य कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी होणार्‍या बैठकीत हे सदस्य पाहणी अहवाल बैठकीसमोर ठेवतील, त्यानंतर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष संमेलन स्थळाची अधिकृत घोषणा करतील.
94 व्या अखिल भारतीय मराठी संमेलनासाठी लोकहितवादी संस्था नाशिक, सार्वजनिक वाचनालय नाशिक, आमळनेर, सेलू आणि पुण्यातील सरहद्द संस्थेचे दिल्लीसाठी निमंत्रण आले होते. त्यामुळे आगामी संमेलन नाशिकला होणार की दिल्लीला याबाबत उत्सूकता निर्माण झाली होती. स्थळ निवड समितीने काल नाशिकच्या लोकहितवादी संस्थेला भेट देऊन पाहंणी केल्यानंतर या समितीने नाशिकच्या संस्थेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता केवळ घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. आगामी संमेलनाच्या आयोजनाचा मान लोकहितवादी संस्थेला मिळणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा