मुंबई, (प्रतिनिधी) : आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. ही बातमी कुठून आली माहीत नाही. मात्र, एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदार्‍या कशा असू शकतात याची चर्चा निश्चित असू शकेल. मी स्वतःच पक्षश्रेष्ठींकडे याआधीच हा विषय मांडला होता. नवीन आणि तरुण नेतृत्वाला संधी मिळत असेल, तर आपला त्याला पाठिंबाच राहील, असे स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी केले. महाराष्ट्राचे नवे प्रभारी एच.के.पाटील यांच्यासोबत आपले चांगले संबंध असून त्याबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन दिवसांपासून बाळासाहेब थोरात यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. थोरात यांच्या दिल्ली भेटीने या चर्चेला आणखीनच बळ मिळाले होते. नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानसभाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आदी नावांची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, थोरात यांनी काल आपण राजीनामा दिलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या अगदी काही दिवसच आधी आपल्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यानंतर राज्यात सरकारही आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद, त्यानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता आणि महसूलमंत्री अशी तीन पदे आपल्याकडे आहेत. एकाच माणसाकडे इतक्या जबाबदार्‍या कशा याची चर्चा असू शकते. मीदेखील स्वतः पक्षश्रेष्ठींकडे हा विषय मांडला होता. पक्ष जर तरुण आणि नवीन नेतृत्वाला संधी देणार असेल, तर त्याला आपला पाठिंबाच राहील. पक्ष म्हणून सर्व ताकद आपण त्यांच्या पाठिशी उभी करू. तसेच प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना आपण कोणतीही गटबाजी न ठेवता सगळ्यांना सोबत घेऊनच काम केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा