टिमवितर्फे आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे : बदलत्या काळानुरूप माध्यमेही बदलली; पण ध्येयवादीऐवजी बाजारीकरणाच्या दिशेने पत्रकारितेची वाटचाल सुरू आहे. माध्यमे विशिष्ट शक्तीच्या ताब्यात गेली आहेत. त्यामुळे ज्ञान, मनोरंजनाला कमी महत्त्व देऊन भडकपणावर भर दिला जातो आहे. बातम्यांच्या माध्यमातून माहिती दिली जात नसून मते लादली जातात. हे चित्र मनाला वेदना देणारे आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार व दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. गोविंद गुंठे यांनी बुधवारी परखड भाष्य केले.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती अर्थातच पत्रकारिता दिनानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम विभागातर्फे दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सत्रात ‘मराठी पत्रकारिता दिन’ या विषयावर डॉ. गुंठे बोलत होते. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक उपस्थित होते.

गुंठे म्हणाले, प्रारंभी पत्रकारितेत त्याग, विद्वता, देशप्रेम, भाषा अनिवार्य होती. आता या गोष्टी मागे पडल्या आहेत. आरडाओरडा करणारे निवेदक आणि भडक बातमीदार पाहून मनाला वेदना होतात.

लोकमान्यांच्या लेखणीने स्वातंत्र्य लढ्याला बळ दिले

बंदूक आणि बॉम्बच्या जोरावर देश स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली असे नाही. त्यात लोकमान्यांच्या लेखणीचा वाटा मोठा आहे. ‘केसरी’च्या माध्यमातून लोकमान्यांनी देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. लोकमान्यांचे अग्रलेख स्वातंत्र्य लढ्याचे दस्तावेज आहेत. त्यांनी कधीच आपली मते लादली नाहीत. उलट धर्म आणि व्यवहार वेगळे नाहीत. देश हे आपले कुटुंब असल्याचे सांगत लोकमान्यांनी भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले. लोकमान्यांनी सुरू केलेला गणेशोत्सव आणि शिवजयंती हे ब्रिटिशांना दिलेले धक्कातंत्र होते, असेही डॉ. गोविंद गुंठे यांनी सांगितले.

सद्य:स्थितीतील बाजारीकरणात विविध प्रकारची माध्यमे भविष्य पाहात आहेत. अशीच स्थिती राहिल्यास वाटचाल अवघड असणार आहे. देशहित, समाजनिष्ठा, सत्याशी बांधिलकी, समर्पित भावना आणि जनहित हाच पत्रकारितेचा गाभा आहे. हाच गाभा आणि ध्येयवादी पत्रकारिता येत्या काळातही अबाधित ठेवण्यासाठी पत्रकारितेची मूल्ये सर्वांनी मिळून जपण्याची गरज आहे.

लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचे ध्येय राजकीय आणि सामाजिक परिवर्तन होते. दर्पण, केसरी, मराठा, इंदूप्रकाश, ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रांनी भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण करून परिवर्तन घडवून आणले. लोककल्याण हे प्रारंभीच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू होता. नानासाहेब परूळेकर, अनंत भालेराव, जयंतराव टिळक, दादासाहेब पोतनीस, गोविंद तळवळकर या दूरदृष्टी आणि ध्येयवादी पत्रकारांनी वृत्तपत्रसृष्टीला सक्षम बनविले, असेही डॉ. गुंठे यांनी स्पष्ट केले.

डॉ. दीपक टिळक म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच ‘केसरी’ने 140 वर्षांचा प्रदीर्घ टप्पा पूर्ण केला, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने 100 वर्षे पूर्ण केली आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी तीन प्रयोगशाळा, अत्याधुनिक साधन-सामुग्री उपलब्ध आहे. बदलत्या काळानुरूप द़ृकश्राव्य शिक्षणाची गरज आहे. माध्यमे तांत्रिकदृष्ट्या बदलली आहेत. माध्यमांत माणसांचे मत बदलण्याची ताकद आहे. माध्यमात काम करताना प्रथम तत्त्वनिष्ठ असायला हवे.

डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम विभागात तीन साऊंड व ब्रॉडकास्ट स्टुडिओची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या विभागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या स्टुडिओला जागतिक मान्यतेच्या एव्हीआयडी संस्थेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. असे प्रमाणपत्र मिळविणारी टिमवि देशातील पहिली शैक्षणिक संस्था असल्याचे नमूद करून त्यांनी या विभागाच्या प्रगतीची व भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. अनामिका हलदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भारती मोटवाणी व अतिफ सुंडके यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा