पवनेच्या तीरावरून : विजय भोसले

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गैरकारभाराने सिमा गाठली आहे. अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी संगनमताने लुटमार सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी बोगस एफडीआरप्रकरणी ठेकेदारांना प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करून त्यांच्यावर तातडीची कारवाई करावी, अशी मागणी करून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत प्रशासन फौजदारी गुन्हे दाखल करत नाही आणि 18 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकत नाही. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने हे प्रकरण लावून धरले तरच प्रशासन हालेल.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या पध्दतीने भूमिका घेतली आहे, त्याच पध्दतीने महापालिकेत आत्ता नव्याने एक 26 कोटींची निविदा काढून यामध्ये सुमारे 18 ते 19 कोटींचे महापालिकेचे नुकसान होणार आहे. म्हणजेच टक्केवारीतून ही लुट होणार आहे. ती थांबविण्यासाठी राष्ट्रवादीने वेळ पडल्यास जनआंदोल उभा करून प्रशासनाला माघार घेण्यास भाग पाडावे. हे जर घडले नाही तर या गैरकारभाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असा संदेश जाईल. भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत भाजपच्या नेत्यांनी व पदाधिकार्‍यांनी महापालिका म्हणजे आपल्या मालकीची संपत्ती आहे. या उद्देशाने विकास कामाच्या नावाखाली जी लुट सुरू केली आहे. आता रूग्णालयात अतिदक्षता विभागासाठी गॅस पुरवठा नावाखाली 26 कोटी 61 लाख 18 हजार 947 रूपयांची निविदा मागविण्याचा घाट घातला आहे. या निविदेची मुदत 4 जानेवारी 2021 ते 25 जानेवारी 21 अखेर ठेवली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय आणि भोसरी रूग्णालय याठिकाणी पाईपलाईनचे काम झाले असताना देखील पुन्हा या कामासाठी आणि आकुर्डी, थेरगावच्या रूग्णालयासाठी गॅस पाईपलाईनच्या व यासंबंधीत कामासाठी निविदा मागविण्याचा घाट घातला असून यामुळे महापालिकेचे सुमारे 18 ते 19 कोटी रूपयांची लुट होणार आहे.

कोणत्याही प्रकल्पाचे अथवा विकास आराखडा तयार करताना तो चांगल्या दर्जाचा चिरस्थायी व्हावा, यासाठी सल्लागार नेमून तो आराखडा तयार केला जातो. मात्र, पिंपरी- चिंचवड महापालिकेत मात्र, प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमून त्या प्रकल्पातून ज्यादा पैसा कसा कमविता येईल, त्याचबरोबर प्रकल्पाच्या किंमती कशा वाढवता येतील, हाच सल्ला देण्याचे काम सल्लागार करत आहेत. मात्र, याविषयावर महापालिकेतील एकही प्रामाणिक अधिकारी अथवा नगरसेवक पुढे येऊन बोलत नाही. हे दुर्देव म्हणावे लागेल. अथवा राजकीय दबावाखातर कोणाची हिंमत होत नाही. आजपर्यंत कोट्यावधी रूपये सल्ल्लगारांवर उधळले असून सल्लागारांनी दिलेल्या सल्यामुळे महापालिकेचे इतके रूपये वाचले अथवा सल्यामुळे एखादा प्रकल्प हा अतिउत्तम झाला, हे प्रशासनाने जाहीर करावे. एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुल या कामासंदर्भात काय दिवे लावले महापालिकेचे किती कोटी नुकसान झाले हे प्रशासनाने जाहीर करावे. म्हणजे महापालिकेची आर्थिक उधळपट्टी कशापध्दतीने होते. यावर कोणाचे नियंत्रण नाही का? महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे नियंत्रण असले पाहिजे. मात्र, ते राजकीय दबावाखाली प्रत्येक काम करत आले आहेत. महापालिकेचा लेखापरीक्षण विभाग महत्वाचा असून ज्यावेळेला लेखापरिक्षण केले जाते. त्या परिक्षणात अनेक त्रुटी काढल्या जातात, आक्षेप घेतले जातात. मात्र, त्या आक्षेपांची पुर्तता होत नाही. वर्षांनुवर्ष हा कारभार असाच सुरू आहे. 267 कोटी विकास कामावर खर्च केलेल्या फायली देखील गायब आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी शासन दरबारी अनेक निवेदने देऊन चौकशीची मागणी केली. मात्र, आजपर्यंत हे प्रकरण दडपून टाकले. एवढा मोठा गैरव्यवहार होऊन पुर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने व त्यानंतरच्या शिवसेना-भारतीय जनता सरकारने याची साधी दखल घेतली नाही.

राज्य सरकार त्याचबरोबर निम सरकारी रूग्णालयात जी वैद्यकीय गॅस व्यवस्थेची सुविधा आहे. त्याचबरोबर अनेक मोठ्या खासगी रूग्णालयात देखील गॅस व्यवस्थेची सुविधा आहे. त्याठिकाणीही एवढा मोठा खर्च केलेला नाही. वास्तविक पाहिजे तर याची पाहणी करून यावे. म्हणजे प्रत्यक्षात कशा पध्दतीने व्यवस्था केली आहे आणि त्यावर किती खर्च झाला आहे. हे लक्षात येईल. पिंपरी- चिंचवड महापालिकेत यशवंतराव चव्हाण रूग्णालय, भोसरी रूग्णालय, पिंपरी येथील जिजामाता रूग्णालय आणि थेरगाव रूग्णालय याठिकाणी 1014 गॅस कनेक्शनचे पाँईट तयार केले असून त्यासाठी हा 26 कोटी खर्च करण्याचा खटाटोप आहे. वास्तविकता हे सगळे बनावट आणि पैसे उकळण्यासाठीच या निविदेचा खटाटोप केला आहे. वायसीएम रूग्णालयात सुरूवातीस 10 बेडसाठी गॅस पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर 700 बेडच्या व्यवस्थेसाठी सोय करण्यात आली. साधारणः चार टन गॅस दररोज लागतो. कोरोना कालावधीत चव्हाण रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यामुळे 20 हजार टन क्षमतेची गॅस पुरवठ्याची सोय करण्यात आली होती. त्यासाठी वेगळी टाकी त्याठिकाणी उभारण्यात आली असून त्याचा खर्च संबंधित ठेकेदारानेच केला आहे. महापालिकेकडून यासंदर्भात एकही पैसा घेतलेला नाही. त्यामुळे महापालिकेची एका अर्थाने पैशांची बचत झाली आहे. कोरोनाचे रूग्ण कमी झाल्यामुळे ज्यादा 20 हजार टनची क्षमता असलेली गॅस यंत्रणा आता पुर्णतः बंद आहे. शिवाय दररोजच्या रूग्णांसाठी आता गॅस कमी लागत आहे. याबाबी संबंधितांनी तपासल्या नाहीत का?

भोसरी रूग्णालयात सध्या 7 ते 8 गॅस सिलेंडर लागतात. त्याठिकाणी 17 लीटर क्षमतेच्या सिलेंडरचा पुरवठा केला जातो. पिंपरी रूग्णालयात 1 हजार लीटर क्षमतेच्या टाक्याची नियोजन केले आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याठिकाणी जागा नाही. हे अंदाजपत्रक कार्यालयात बसून केले आहे हे स्पष्ट होते. पिंपरी रूग्णालयात 10 बाय 10 मॅनिफोल्डची व्यवस्था असल्यामुळे त्याठिकाणी गॅस पुरवठ्याची अडचण भासणार नाही. शिवाय अ‍ॅटलॉस या जागतिक कंपनीने हे तयार केले असून त्याचा दर्जाही उत्तम आहे.

थेरगाव याठिकाणी 13 हजार लीटर क्षमतेची टाकी उभारण्यात येणार आहे. वास्तविक 1 टाकी बांधण्यासाठी साधारणः 20 लाख रूपये खर्च येतो. तर मग पिंपरी, भोसरी आणि थेरगाव याठिकाणी 60 लाख रूपये खर्च येईल. शिवाय वायसीएम आणि भोसरी रूग्णालयात जो गॅस पाईपलाईनसाठी खर्च केला आहे. तो सीएसआर फंडातून केला आहे. गॅस पाईप लाईन योजना करताना त्या रूग्णालयाची क्षमता पाहूनच अंदाजपत्रक केले जाते. मात्र, याठिकाणी या सर्व बाबींना फाटा देण्यात आला आहे. 1014 जे पाँईट शोधले आहेत. ते कोणत्या आधारे याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे.

कोणत्याही रूग्णालयात प्राणवायू पुरवठा यंत्रणा उभारताना खालील तीन मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे. वैद्यकीय प्राणवायू पुरवठा यंत्रणा, त्याचा वितरणासाठी 45 मि.मि, 42 मि.मि., 28 मि. मि व्यासाच्या नलिका असणे आश्वयक आहे. या सर्व यंत्रणेचे उभारणी करताना त्या रूग्णालयात सर्वसाधारण रूग्णांसाठी असणार्‍या खाटा आणि अतिगंभीर रूग्णांसाठी असलेला कक्ष यांची क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे. वैद्यक प्राणवायू पुरवठा करताना तो तांब्यांच्या नलिकांमधून योग्य दाबाव्दारे आणि फिल्टरमधून केला जाणे आवश्यक आहे. याची क्षमताही रूग्णालयाच्या क्षमतेवर अंवलबून राहिल. मध्यवर्ती निर्वात यंत्रणा आणि निर्वात टाकी वरीलप्रमाणेच अतिगंभीर रूग्णांसाठीच्या कक्षाच्या क्षमतेवर अंवलबून राहिल. ही यंत्रणा कोणत्याही शासकीय, निम शासकीय रूग्णालयाचा प्राण आहे. केंद्र सरकारने देखील महत्वाच्या अगदी पुणे आणि महाराष्ट्रात या यंत्रणांचा स्विकार केला आहे. त्यासाठी वेगळा कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणात केवळ ठेकेदाराचे हित पाहून ही निविदा काढण्यात आली आहे. या प्रकरणाची संपूर्ण तपासणी होणे आवश्यक आहे. कारण, यामध्ये खर्चाच्या तुलनेत रूग्णांचा कोणताही फायदा दिसून येत नाही. या प्रकरणाची संपूर्ण तपासणी त्रयस्थ शासकीय यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खर्चाची छाननी होणे देखील आवश्यक आहे.

या रूग्णालयातील निविदा मिळविण्यासाठी घाट राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या नातेवाईकासाठी घातला असून यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी भागीदार आहेत. आणि यामुळेच महापालिकेच्या आर्थिक हिताचा विचार न करता केवळ 8 ते 9 कोटी रूपये खर्च येत असताना तो 26 कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च होईल. त्या उद्देशानेच ही निविदा काढली आहे. भांडार विभागातील अधिकार्‍यांनी गेल्या काही वर्षांत महापालिका दिवाळखोरीत काढण्याचा आणि स्वतः मलई लाटून राजकारणी लोकांना खुश करण्यासाठीच हा खटाटोप सुरू असून जनतेने याविरोधात आवाज उठवावा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा