पुणे : सत्यनिष्ठ बातमीदारीची देदीप्यमान परंपरा असणार्‍या लोकमान्यांच्या ‘केसरी‘ने सोमवारी 141 व्या वर्षात पर्दापण केले. वर्धापनदिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, साहित्य, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दिवसभर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला.
यंदा कोरोनामुळे स्नेहमेळावा होऊ शकला नाही. मात्र प्रदीर्घ काळापासून असलेल्या ऋणानुबंधामुळे मान्यवरांसह वाचकांनी दूरध्वनी, समाज माध्यमांसह प्रत्यक्ष कार्यालयात भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच ऑनलाइन ‘केसरी’वरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर : लोकमान्यांचा ‘केसरी’ छापून झाल्यानंतर कधी हातात पडेल, याची देशाला उत्सुकता असायची. केसरीच्या अग्रलेखाने मनामनात देशभक्तीची बीजे रूजविली. त्यामुळे देश स्वातंत्र्याच्या लढ्यात केसरीचे योगदान मोठे आहे. आजही सकारात्मक बातम्यात केसरी आघाडीवर आहे. पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा..
गणित तज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर : बालपणी सुट्यांत आजोबांकडे आल्यानंतर ‘केसरी’ वाचायला मिळायचा. तेव्हापासून ते आजपर्यंत एक वाचक म्हणून ‘केसरी’शी ऋणानुबंध आहे. केसरीला 140 वर्ष पूर्ण झाली, याचा मनोमन आनंद आहे. केसरीची प्रदीर्घ यशस्वी वाटचाल ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट : सातत्याने चांगले काम करणे सोपे नाही. मात्र वाचकांशी बांधिलकी जपत हे शिवधनुष्य ‘केसरी’ने पेलले आहे. लोकमान्यांच्या लौकिकाला साजेसे काम आजही सुरू आहे. ‘केसरी’ नुसता सुरू नाही, तर दर्जा कायम आहे. विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतरही केसरीत भडकपणा दिसत नाही, याचे मला कौतुक आहे.
संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दीब्रिटो : लोकमान्यांचा समर्थ वारसा ‘केसरी’ने आजही जपला आहे. लोकमान्यांनी स्वाभिमानी पत्रकारितेचा आदर्श देशासमोर ठेवला आहे. याच केसरीच्या माध्यमातून सह्याद्रीच्या वाघाने डरकाळी फोडून ब्रिटिशांना जेरीस आणले होते. केसरी जनमानसात तसेच राज्यासह देशाच्या मानसिकतेत रूजला आहे. मी बालपणापासून केसरी वाचत आलो आहे. ‘केसरी’चा मला सार्थ अभिमान आहे.
ज्येष्ठ नेते उल्हास पवार : दळणवळणाचे कोणतेच साधन नसतानाही केवळ लोकमान्यांच्या सिंहगर्जनेमुळे ‘केसरी’ देशात नव्हे, तर जगात पोहचला. ब्रिटिशांनाही लोकमान्य आणि ‘केसरी’ची दखल घ्यावी लागली. केसरीने स्वातंत्र्याचा देशाला मंत्र दिला. देश स्वातंत्र्यासाठी देावासीयांच्या मनात ऊर्मी तयार केली. त्यामुळे माध्यमांच्या विश्वात ‘केसरी’चे स्थान अटल आहे. केसरी 141 व्या वर्षात पर्दापण करीत आहे. याचा मला भारतीय म्हणून सार्थ अभिमान आहे.
डॉ. गजानन एकबोटे : ‘केसरी’ हे राज्यातील अग्रगण्य दैनिक आहे. प्रदीर्घ काळापासून केसरीने तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली आहे. 140 वर्षानंतरही सर्वसामान्यांच्या समस्या मांडण्याचे कार्य केसरी करीत आहे. येत्या काळातही ‘केसरी’ची वाटचाल अशीच सुरू राहो, ही सदिच्छा..
दि पुना मर्चंटस्चे माजी अध्यक्ष वालचंद संचेती : दीर्घकाळापासून माहितीच्या रूपाने नागरिकांना अद्यवत ठेवण्याचे कार्य ‘केसरी’ने केले आहे. त्यामुळेच वाचकांच्या मनात केसरीविषयी नितांत आदराची भावना आहे.
शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस. के. जैन ः भारतातच नव्हे, तर विश्वात लोकमान्यांनी निर्भीडपणे स्वाभिमानाचा नारा दिला होता. लोकवारसा असणारा ‘केसरी’ पुण्याचा, महाराष्टाचा, भारताचा परंपरा जोपसणारा व सर्वसामान्य माणसाचा आवाज बुलंद करणारा आहे. सर्वसामान्यांना शिकता यावं असे हे वृत्तपत्र आहे. पुण्याचे वृत्तपत्र असल्याने आम्हाला अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाचकांना ‘केसरी’ भरुभरुन देत आहे. या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव : गेल्या अनेक वर्षांपासून मी ‘केसरी’चा वाचक आहे. केसरी ही वाचन चळवळ आहे. लाखो कार्यकर्त्यांना माहितीचे बळ देणारी केसरी ही चवळवळ 140 वर्षांची झाली, याचा मनस्वी आनंद आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात केसरीचे योगदान मोठे आहे. केसरीचा इतिहास आणि कार्य मनात कायम आहे आणि राहीलही.
विद्युत रोषणाईने उजळला केसरीवाडा
‘केसरी’च्या 140 व्या वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण केसरीवाड्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. केसरीवाड्यातील गणेश मंदिरासमोर स्वागत करणारी रांगोळी साकारण्यात आली होती. आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सोमवारी केसरीवाडा उजाळून निघाला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा