मुंबई, (प्रतिनिधी) : तुम्ही कर्तव्यावर सज्ज असता म्हणूनच आम्ही नागरिक म्हणून सण, उत्सव शांततेत साजरे करू शकतो. कालची रात्र तुम्ही जागून काढली. म्हणून आज आम्ही नवीन वर्षाचा पहिला दिवस उत्साहाने सुरू करत आहोत. इतरांप्रमाणे तुम्हाला ’वर्क-फ्रॉम-होम’ची सवलतही नाही. म्हणूनच मी तुमचे आभार मानायला आलो आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला डाग लागणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पोलीस दलाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

नववर्षाच्या प्रारंभीच काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या काळात लॉकडाउन केले, निर्बंध लादले, वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला. क्षणभर विचार केला पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केले असते तर? पण तसे झाले नाही. पोलीस फ्रंटलाइनवर काम करत होते म्हणूनच कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली. कोरोनासोबतच्या लढ्यात अनेक पोलीस शहीद झाले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःखही व्यक्त केले.

खबरदारी आवश्यकच

हे बंद, ते बंद करण्याची गोष्ट चांगली नाही, हे सगळ्यांनाच कळते. पण अजूनही संकट गेले नाही. पाश्चिमात्य देशात कोरोनाचा नवा धोका तयार झाला आहे. त्यामुळेच नागरिकांच्या हितासाठी किमान खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. जीव धोक्यात घालून यंत्रणा काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी किमान खबरदारी घ्यावी म्हणून आणि शिस्त पाळावी म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत आनंदात आणि उत्साहातच व्हावे. पण भानावर राहून पुढचे पाऊल टाकावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठीच काही बंधने घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बदनामी करणार्‍यांची तोंडे बंद

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर झालेल्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. पोलिसांचे कर्तृत्व हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यामुळे त्यांची बदनामी करणार्‍यांची तोंडं बंद झाली. कुणी कितीही आदळआपट केली तरीही त्यावर डाग लागूू शकणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा