करुणा पाटील

२६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय सर्कसचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. उद्या (गुरुवारी) साजरा होणार्‍या या दिनानिमित्त…

जागतिक सर्कसच्या दृष्टीने दरवर्षी एप्रिल महिन्याचा तिसरा शनिवार हा दिवस ’जागतिक सर्कस दिन’ म्हणून महत्त्वाचा मानला जातो. तसेच 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ’भारतीय सर्कसचा जन्मदिन’ म्हणून साजरा होत असतो. युरोपमध्ये सर्कसच्या जन्मानंतर खूप उशिरा भारतात सर्कस सुरु झाली. 26 नोव्हेंबर 1882 या दिवशी मुंबईतील क्रॉस मैदान येथे घोड्यांचे कसरतपटू विष्णुपंत छत्रे यांनी त्यांच्या ’ग्रँड इंडियन सर्कस’चा पहिला शो केला आणि भारतीय सर्कसचा जन्म झाला.

विष्णुपंत छत्रे हे घोड्यांचे प्रशिक्षक होते. सांगली जिल्ह्यातील कुरुंदवाड व अन्य अनेक संस्थानिकांच्या घोड्यांना ते चाल शिकवत व त्यांच्याकडून कवायती करून घेत. त्याच काळात इंग्लंडच्या चर्नी विल्सन या घोड्यांच्या ट्रेनरनी मुंबईतील बोरीबंदर येथे त्याची ’हर्मिस्टन सर्कस’ सुरु केली होती. त्या काळी 1882 मध्ये चित्रपट, दूरचित्रवाणी नसल्याने मनोरंजन करणार्‍या सर्कसला मोठा प्रतिसाद मिळायचा.

मुंबईच्या बोरीबंदर येथील चर्नी विल्सनची सर्कस बघण्यासाठी कुरुंदवाडसह अनेक संस्थानिक त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईला पोहोचले. विष्णुपंत छत्रे देखील त्यांचे सोबत होते. हर्मिस्टन सर्कस मधील चर्नी विल्सनने घोड्यावर उभे राहून केलेल्या नेत्रदीपक कसरतींनी सारे थक्क झाले. मात्र ’कोणाही भारतीयास घोड्यांच्या अशा कसरती करणे शक्य आहे काय?’ हे चर्नी विल्सनने दिलेले आव्हान प्रखर राष्ट्रभक्त असणार्‍या विष्णुपंत छत्रे यांनी स्वीकारले आणि सुमारे 7-8 महिन्यांतच पूर्ण तयारी करून त्यांनी मुंबईच्या क्रॉस मैदानावर तंबू ठोकला. त्यांच्या सर्कसमध्ये 2 सिंह रथ ओढत रिंगणामध्ये येतात त्यावेळी रथातील स्वातंत्र्य देवतेचे रूप धारण केलेल्या तरुणीस ’गणा’ हा हत्ती पुष्पहार घालायचा. या बरोबरच विष्णुपंत छत्रे यांच्या घोड्यावरील कसरती पाहून प्रेक्षक थक्क व्हायचे. विष्णुपंत छत्रे यांच्या ’ग्रँड इंडियन सर्कस’चा पहिला खेळ 26 नोव्हेंबर 1882 रोजी झाला आणि हाच भारतीय सर्कसचा जन्मदिन होय.

विष्णुपंत छत्रेंची सर्कस एवढी लोकप्रिय झाली होती की समोरच्या बाजूस चालू असलेल्या चर्नी विल्सनच्या हर्मिस्टन सर्कसला ओहोटी लागली आणि कालांतराने सर्कसचा तंबू, प्राणी व कलाकारांसह सारी हर्मिस्टन सर्कस विष्णुपंत छत्रे यांनी विकत घेऊन ग्रँड इंडियन सर्कसमध्ये विलीन केली.

विष्णुपंत छत्रे यांनी त्यानंतर सर्कसमध्ये अनेक प्रयोग केले. नवनवीन खेळ योजिले. केवळ भारतातच नव्हे तर जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, चीन अशा देशांमध्ये देखील त्यांची सर्कस जाऊन आली. अनेक वर्षे सर्कस चालवल्यानंतर या सर्कसची धुरा त्यांनी त्यांचे बंधू काशिनाथपंत छत्रे यांच्याकडे सोपवली.

यानंतर देवल, कार्लेकर, माळी, शेलार, वालावलकर अशा अनेक मराठी कुटुंबीयांच्या सर्कशींनी सार्‍या देशात नावलौकिक मिळवला. त्याकाळात सर्कसचे मालक व त्यांचे कुटुंबीयच सर्कस कलावंत असत. यातील अनेक सर्कस परदेशी देखील जाऊन आल्या. चित्रशाळेचे जोशी यांच्यासह अनेक क्रांतिकारकांना त्याकाळात सर्कसने आसरा दिला होता. हे सारे सर्कसमध्ये तिकीट विक्रेते, प्राण्यांची देखभाल करणारे, स्वयंपाकी अशी विविध कामे करीत. क्रांतिकारकांसाठी सर्कस हे विश्वासाचे ठिकाण बनले होते.

आता भारतात सर्कस लोप पावत चालली आहे. शहराच्या मध्य भागात स्वस्त दरात मैदाने नाहीत, डिझेल व वाहतुकीचा मोठा खर्च, वाघ, सिंह, माकड, चिंपांझी, हिप्पोपोटेमस, हत्ती अशांच्या खेळावर बंदी अशा विविध कारणांमुळे वाहिन्या, चित्रपट व समाज माध्यमांच्या काळात सर्कस मागे पडत गेली. लोकांचा भरपूर पाठिंबा व प्रेम सर्कसला आहे. मात्र सरकारतर्फे काहीही मदत नाही.

युरोप, अमेरिका, रशियात सर्कसला मानाचे स्थान आहे. तेथे प्राण्यांच्या खेळावर बंदी नाही त्यामुळे तेथील सर्कस जोमाने चालू आहेत. आपल्याकडे मात्र सर्कसशी संख्या रोडावत आहे. तिकिटांचे दर देखील अगदी कमी असतात. 12 महिने खर्च आणि पावसाळा सोडून उरलेले 8 महिने उत्पन्न अशा आर्थिक परिस्थिती सर्कस चालवणे ही आता ‘सर्कस’च बनली आहे! कोरोनाच्या काळात सार्‍या देशात फिरण्यास बंदी त्यामुळे सर्कस आहे त्या गावात, आहे त्या जागी बंद अवस्थेत आहे. अशा अवस्थेत सर्कशीच्या मदतीसाठी सरकारने पुढे यायला हवे. 138 वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर या दिवशी विष्णुपंत छत्रे यांनी सुरु केलेल्या भारतीय सर्कसला चांगले दिवस यावेत आणि सर्व सर्कस कलावंत, कर्मचारी आणि आपला लाडका विदूषक हे सारे सुखी राहावेत हीच प्रार्थना या निमित्ताने करते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा