पुणे : सुमारे अर्धा ते पाऊण तास कोसळलेल्या पावसामुळे सोमवारी मध्यवस्तीतील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले. वाहत्या पाण्यामुळे रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. वाहतुकीचा पुरता खेळखंडोबा झाला. वाहत्या पाण्याचा निचरा होण्यास मार्गच शिल्लक नसल्याने अक्षरश: पुणे तुंबले ! पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची तसेच नाल्यांची कामे पूर्ण केली, असा दावा करणार्‍या महापालिका प्रशासन व राजकीय नेत्यांचे पावसामुळे पितळ उघडे पडले.

शहरात दुपारी सव्वा तीनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्ध्या तासातच रस्त्यांवरून नाल्यासारखे पाणी वाहू लागले. वाहत्या पाण्याला इतका वेग होता, की दुचाकी पाण्यात ओढल्या जात होत्या. दुसरीकडे, पाण्याचा निचरा होण्यास मार्गच नसल्याने पाणी तुंबले होते. अनेक दुकाने आणि सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. गेल्या काही दिवसांत हे वारंवार घडत असल्याने पुणेकरांना कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न केला जात आहे.

शिवाजी रस्त्यावरील श्री दत्त मंदिर ते लाल महाल परिसरात प्रचंड पाणी वाहत होते. या मार्गावरील वाहतूक काही वेळ बंद होती. सुमारे अर्धा फूट पाणी साचले होते. पादचारी मार्गही पाण्याखाली गेला होता. त्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण जात होते. बोहरी आळी, गुरुवार पेठ, महात्मा फुले मंडई, तुळशीबागेतील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यालाही पाण्याचा वेढा होता. त्यामुळे काल सर्वार्थाने नागरिकांची कोंडी झाली होती. रात्री उशिरापर्यंत हे चित्र कायम होते.

वाहतूक कोंडीचा विळखा

पावसामुळे कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता आणि शंकर शेठ रस्त्यावरील वाहतूक थांबली होती. बहुतांश महत्त्वाच्या चौकांतील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. रात्री उशिरापर्यंत वाहनांचा वेग मंदावलेला होता. गेल्या 24 तासांत शहरात 32.6 मि.मी. पाऊस पडला. तर 1 ऑक्टोबरपासून शहरात 209.7 पाऊस झाला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा