फुलांना मागणी नसल्याने शेतकरी हताश
पुणे : दसरा आणि दिवाळीला झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र ऐन फुल तोडणीच्या वेळी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे फुलांचे प्रचंड नुकसान झाले. नवरात्रोत्सवही साध्या पद्धतीने साजरा केला जात असल्याने फुलांना मागणी कमी आहे. एकीकडे पावसाचे संकट, तर दुसरीकडे बाजारात फुले विकत नाहीत. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांनी रविवारी अक्षरश: रस्त्यावर झेंडूची फुले फेकून दिले.
नुकत्याच झालेल्या पावसाचा फुलांवर मारा झाला आहे. परिणामी फुले खराब झाली आहेत. दोन पैसे मिळतील या आशेने शेतकरी फुले बाजारात आणत आहेत. मात्र फुजलेल्या आणि खरात होण्याच्या स्थितीत असलेल्या फुलांची विक्रीच होत नसल्याने शेतकर्‍यांचा वाहतूक खर्चही निघेनासा झाला आहे. व्यापार्‍यांनी प्रयत्न करूनही फुलांची विक्री होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे परिस्थितीने हताश झालेल्या शेतकर्‍यांनी सुमारे 2 ते 3 ट्रक झेंडूची फुले फेकून दिली. तसेच व्यापार्‍यांनीही शिल्लक राहिलेली फुले फेकून द्यावे लागले. या प्रकारामुळे फुलबाजारात फेकून दिलेल्या फुलांचा खर्च पडला होता.
याबाबत फुलबाजार संघटनेचे अध्यक्ष अरूण वीर म्हणाले, पावसामुळे फुलांचे तसेच फुल शेतीचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. बाजारात विक्रीला येत असलेली सुमारे 70 टक्के फुले खराब झालेली आहेत. मंदिरे बंद आहेत. घरात साध्या पद्धतीने घटस्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मंदिर आणि परिसरात झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात सजावट केली जाते. घरगुती ग्राहकांकडूनही फुलाच्या हारासाठी मागणी असते. यंदा मागणीत निम्याने घट झाली आहे. फुलेही हलक्या प्रतीची आहेत. त्यामुळे अशा फुलांकडे ग्राहक पाठ फिरवित आहेत.
पुणे जिल्ह्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून बाजारात साध्या झेंडूच्या फुलांची आवक होत आहे. रविवारी झेंडूच्या फुलांना प्रती किलोला 5 ते 10 रूपये दर मिळाला. सोमवारी त्यात थोडी वाढ झाल्याने किलोचा दर 10 ते 20 रूपये होता. कलकत्ता झेंडूच्या फुलांना मात्र प्रती किलोला 20 ते 50 रूपये दर मिळाला. पावसामुळे सकाळी विक्रीला आलेली फुले दुपारनंतर खराब होत आहेत. त्यामुळे सायंकाळी खराब झालेली फुले फेकून द्यावी लागत असल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.
बाजारातच फुले सोडून आलो
रविवारी 80 कॅरेटमधून फुले पाठविली होती. त्यातील 19 कॅरेटच्या फुलांची 5 ते 10 रूपयांनी विक्री झाली. उर्वरित फुले शिल्लक राहिली. मिळणार्‍या दरातून वाहतूकीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे उर्वरित फुले गाळ्यावर सोडून गावी परतलो आहे. ती विकली का फेकून दिली? याबाबत व्यापार्‍यालाही फोन केला नाही. मंदिरे जोपर्यंत खुली होणार नाहीत. तोपर्यंत फुलांना मागणी वाढणार नाही. या पावसामुळे फुलोत्पादक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. – अप्पा कोकाटे, शेतकरी, आळेगाव खुर्द, ता. म्हाडा

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा