पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या महिन्यात तब्बल 860 गावांमध्ये कोरोना संसर्ग सर्वाधिक होता. या गावांची संख्या 395 ने कमी होऊन सध्या 465 गावांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान, शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही दररोज उपचारानंतर बरे होणार्‍या रुग्णांची संख्या जास्त असून हे प्रमाण सध्या 90 टक्क्यांवर गेले आहे.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी झाले असून उपचारांनंतर बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यात 200 व्हेंटिलेटर शिल्लक आहेत. त्यापैकी पुणे शहरात 102 व्हेंटिलेटर शिल्लक आहेत.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न वापरणे आणि थुंकणे याप्रकरणी शहरासह जिल्ह्यात 11.50 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आगामी काळात नवरात्र, दिवाळी यांसारख्या उत्सवांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कारवाई आणखी कडकपणे राबवण्यात येणार असल्याचेही राव यांनी सांगितले.

रक्तद्रव दानासाठी सर्वेक्षण
कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी रक्तद्रव दान करावे, याकरिता पुणे महापालिका आणि शहर पोलीसांच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. करोनामुक्त होऊन 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित नागरिकांशी संपर्क करुन त्यांना रक्तद्रव दान करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत आठ हजार पिशव्या रक्तद्रव संकलित करण्यात आले असून गरजेनुसार 750 पिशव्या रक्तद्रव कोरोना रुग्णांना देण्यात आले आहे, असेही राव यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा