घाऊक 60, तर किरकाळमध्ये 70 रूपये किलो
पुणे : कांदा उत्पादन क्षेत्रात कांद्याच्या पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हंगामही लांबणीवर पडला आहे. त्यातच दक्षिण भारतातून कांद्याला मागणी वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून घाऊक बाजारात जुन्या कांद्याच्या दराने ऊच्चांक गाठला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला घाऊक बाजारात 10 किलोला 550 ते 620 रूपये दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारातही किलोच्या दराने सत्तरी गाठली आहे. आवक वाढेपर्यंत दर टिकून राहणार असल्याचा अंदाज व्यापारी रितेश पोमण यांनी रविवारी व्यक्त केला.
मार्केटयार्डातील कांदा विभागात पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातून 40 ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली. त्यातील 60 टक्के कांद्याचा दर्जा खालावला आहे, तर 30 टक्के कांदा चांगल्या प्रतीचा आहे. चांगल्या प्रतीच्या 10 किलो कांद्याला 550 ते 620 रूपये दर मिळाला. तसेच हलक्या प्रतीच्या कांद्याला 400 ते 550 रूपये दर मिळाला. श्रीगोंदा परिसरातून नवीन कांद्याच्या 300 पिशव्यांची आवक झाली. मात्र हा कांदा हलक्या प्रतीचा आहे. त्यामुळे 10 किलोला 200 ते 350 रूपये दर मिळाला. दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. तसेच पुणे विभागासह राज्यातूनही मागणी होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले असल्याचेही पोमण यांनी नमुद केले.
पोमण म्हणाले, शहरातील हॉटेल, खानावळी, विविध खाद्यपदार्थ विक्रींचे केंद्र सुरू झाली आहेत. त्यामुळे कांद्याला मागणी कायम आहे. एकीकडे दिवसेंदिवस मागणी वाढत जाणार आहे. तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी नोव्हेबरमध्ये नवीन कांद्याचा हंगाम सुरू होतो. मात्र यंदा तो डिसेंबरमध्ये सुरू होईल. तसेच पावसाच्या मार्‍यामुळे दर्जा कितपत चांगला राहिल याची शाश्वती नाही. तसेच वखारीतील जुना कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे दर आणखी काही काळ टिकून राहणार असल्याचेही पोमण यांनी सांगितले.
चौकट
घाऊक बाजारातील ऑक्टोबरमधील दर
सन दर
2017 15 ते 20 रूपये
2018 30 ते 40 रूपये
2019 40 ते 50 रूपये
2020 50 ते 70 रूपये

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा