पुणे : मार्केटयार्डातील बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातून शेतीमाल विक्रीला येतो. त्यामुळे रोज सर्व प्रकारची मिळून बाजारात 4 ते 5 हजार वाहने येतात. तसेच शहराच्या विविध भागातून खरेदीसाठी जाणार्‍या वाहनांची संख्या तितकीच आहे. रोज वाढणार्‍या वाहनांमुळे एकीकडे या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढत आहे. तर दुसरीकडे क्षमतेपेक्षा अधिकचे ओझे या रस्त्याला सोसेनासे झाले आहे. त्यातच सातारा रस्त्यावरील सिंग्नल ते काळूबाई देवीच्या मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यावर विक्री करणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अतिक्रमण आणि पथारीवाल्याचा विळखाही पडला आहे.
बाजारात येणारे प्रत्येक वाहन या रस्त्याने येते. तसेच या रस्त्याने ये-जा करणार्‍या इतर वाहनांची संख्याली लक्षणीय आहे. त्यामुळे इतर रस्त्याच्या तुलनेत या रस्त्याचा कायमच वाहतूक कोंडीने श्वास कोंडलेला असतो. विशेष म्हणजे रात्री इतर रस्त्यांवरील वाहनांचा ताण काही प्रमाणात कमी होतो. मात्र भाजीपाला, कांदा-बटाटा, फळे, फुले, केळी आदी विभागात रात्रीपासूनच माल दाखल होण्यास सुरूवात होती. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही वाहनांचा ताण कायम असतो. बर्‍याच वेळा या रस्त्यावरून जाणार्‍या वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाडी वाहतूक पोलिस आणि बाजार समिती प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची नितांत गरज आहे.
भाजी विक्रेते, फळ विक्रेते, किराणा दुकानदार, फुल विक्रेते, पान टपरीवाले आदी मंडळी मार्केटयार्डातून खरेदी करतात. तसेच येथे खरेदीसाठी येणार्‍या घरगुती ग्राहकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे बाजारातील विविध विभागातून मालाची खरेदी करून बाहेर रस्त्यावर विकणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढत असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. विक्रेते, अतिक्रमणाकडे पोलिस आणि बाजार समिती प्रशासन डोळे झाक करत असल्याने वाहतूक कोंडीसह अतिक्रमणाचा विळखा शिवनेरी रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचा व्यापारावर परिणाम होत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी व्यापारी करीत आहेत.

रिकामी जागा पार्किंगसाठी
शिवनेरी आणि नेहरू रस्त्यांवरील रिकाम्या जागेवर होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी उपाय-योजना सुरू आहेत. या दोन्ही रस्त्याबाबत अभ्यास सुरू आहे. लवकरच या रस्त्यावरील छोट्या छोट्या रिकाम्या जागा प्रायोगित तत्वावर पार्किंगसाठी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे अतिक्रमण थांबेल. आणि बाजार समितीला उत्पन्न सुरू होईल. वाहतूकीबाबतही महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने नियोजन केले जात आहे. – मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती.
रस्त्यावर बाजार समितीची मालकी
महात्मा फुले मंईतून बाजाराचे मार्केटयार्डात स्थलांतर केल्यानंतर शिवनेरी आणि नेहरू रस्ता बाजारात माल घेऊन येणार्‍या वाहनांसाठीच होता. मात्र 1990-91 च्या दरम्यान शिवनेरी रस्ता इतर वाहनांच्या वाहतूकीसाठी खुला झाला. तोपर्यंत सातारा रस्त्याने येणारी वाहने स्वारगेटमार्गे शंकर रस्त्याला जात होती. सद्य:स्थितीत शिवनेरी रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्याची देखभाल दुरूस्ती महापालिका करते मात्र रस्त्यावर बाजार समितीची मालकी आहे. त्यामुळे बाजार समिती प्रशासन, पोलिस आणि महापालिका प्रशासनाने या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रान सोडवावा.- विलास भुजबळ, अध्यक्ष, आडते असोसिएशन.

मिळून कारवाई करायला हवी
शिवनेरी रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पादचारी मार्गासह रस्त्यावर थांबून विविध वस्तूची विक्री करणार्‍यांची संख्या वाढली आहे. वाहनतळ अपुरे पडत असल्याने रस्त्यावर वाहने लागत आहे. महापालिकेने याआधी खुप वेळा कारवाई केली आहे. मात्र पुन्हा आठवडाभरानी अतिक्रमण होते. डिव्हायडरवरही अतिक्रमण होते. त्यामुळे वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बाजार समिती, पोलिस आणि महापालिका प्रशासनाने एकत्र कारवाई करण्याची गरज आहे. – प्रवीण चोरबेले, अध्यक्ष, बिबवेवाडी प्रभाग समिती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा