मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे कटाक्षाने पाळावे

पुणे : पाऊस संपून थंडी सुरू होणार असल्याने सर्दी, खोकला, ताप, सारी आजारांमध्ये वाढ होणार आहे. नवरात्र, दिवाळी आणि नाताळ यांसारखे मोठे सण आणि लॉकडाऊन शिथिलता अंतर्गत सर्वच क्षेत्रे खुली होत आहेत. त्यामुळे पुण्यात डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या रुग्णसंख्या कमी होत असली, तरी दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण 16 टक्के आहे. कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली.

आयुक्त राव म्हणाले, पाऊस संपून थंडी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या दूसर्‍या लाटेबाबत सतर्क राहण्याबाबत सूचना आल्या आहेत. दरवर्षी थंडीमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि सारी या आजारांमध्ये वाढ होत असते. त्यानुसार यंदा थंडीमध्ये या आजारांच्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नवरात्र, दिवाळी आणि नाताळ या मोठ्या सणांनिमित्त नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. यासह राज्य सरकारकडून लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यात येत असून बहुतांशी सर्वच क्षेत्रे सुरू करण्यात येत आहेत. या पाश्र्वभूमीवर डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनाची दूसरी लाट येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुसरी लाट पहिल्याप्रमाणे तीव्र नसेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र, याबाबत ठाम माहिती अद्यापही प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे, असेही राव यांनी सांगितले.

कोरोनाचा आलेख सध्या स्थिर

दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रमाण 16 टक्के आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला हे प्रमाण 31 टक्के, अखेरीस 26 टक्के होते, तर सप्टेंबरच्या सुरूवातीला हेच प्रमाण 25 टक्के आणि अखेरीस 23.50 टक्के एवढे होते. त्यानुसार दररोज चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचे प्रमाण सध्या, तरी स्थिर आहे, असे राव यांनी सांगितले.

‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ मोहीम

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा पहिला टप्पा 10 ऑक्टोबरला संपला आहे. या टप्प्यात 91 टक्के नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. दुसरा टप्पा 14 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून यामध्ये ‘पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 15 स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करोना बचावाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानुसार दृकश्राव्य माध्यमांतून चलचित्रफिती दाखवणे, 300 बस गाड्यांवर फलक लावणे, शाळा, रुग्णालये, मंडई याठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे, असेही राव यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा