चंडीगड : अनेक वर्षांपासून दहशतवादारोधात लढा देणारे शौर्यचक्र विजेते बलविंदर सिंग यांची शुक्रवारी पंजाबमध्ये तरनतारन जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यासह त्यांचे कुटुंब दहशतवाद्यांचे लक्ष्य होते.

62 वर्षांच्या बलविंदर सिंग यांच्यावर घरातच हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर सिंग यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सिंग यांच्यावर दोघांनी गोळीबार केला असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवाद्यांनी अनेकदा हल्ले केल्यामुळे सिंग यांना सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, स्थानिक पोलिसांच्या शिफारशीनंतर वर्षभरापूर्वीच त्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. दहशतवाद्यांविरोधातील लढ्यासाठी त्यांना 1993 मध्ये शौर्यचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

1980 आणि 90 या दशकांमध्ये दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी सिंग यांनी कुटुंबाचेच पथक तयार केले होते. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी अनेकदा हल्ले केले. मात्र, सर्व हल्ल्यांतून ते बचावले होते. दहशतवाद्यांविरोधातील योद्धे अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दखल घेतली होती. त्यानंतर भारत सरकारनेही त्यांच्या कामगिरीचा गौरव केला होता.

सिंग यांचे बंधू रणजीत सिंग यांनीही पंजाबमधील दहशतवादी कारवायांना विरोध केला होता. सिंग कुटुंबावर 16 वेळा दहशतवादी हल्ले झाले आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा